Contact Banner

लग्नसमारंभाहून परतताना भीषण अपघात ; गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्रशासकीय अधिकारी प्रवीण कोल्हे यांचा मृत्यू

 

godavari-college-nursing-administrative-officer-pravin-kolhe-dies-road-accident-returning-from-wedding

लग्नसमारंभाहून परतताना भीषण अपघात ; गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्रशासकीय अधिकारी प्रवीण कोल्हे यांचा मृत्यू

जळगाव (लेवाजगत न्यूज प्रतिनिधी) : लग्नसमारंभ आटोपून कुटुंबासह मूळ गावी परतत असताना झालेल्या भीषण अपघातात गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्रशासकीय अधिकारी प्रवीण प्रल्हाद कोल्हे (वय ४८, मूळ रा. रोझोदा, ता. रावेर, ह.मु. जळगाव) यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे जळगावसह रावेर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण कोल्हे हे गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग येथे प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. दि. १३ मे रोजी त्यांच्या एका नातेवाईकाचा विवाह सोहळा भुसावळ येथे आयोजित करण्यात आला होता. या विवाहासाठी प्रवीण कोल्हे हे पत्नी हर्षा कोल्हे, मुलगी निर्मिती कोल्हे, आई उषा कोल्हे तसेच वहिनी भावना कोल्हे यांच्यासह कारने भुसावळ येथे गेले होते.

लग्नसोहळा आटोपल्यानंतर रात्री उशिरा सर्वजण आपल्या मूळ गावी रोझोदा येथे जाण्यासाठी निघाले. दि. १४ मे रोजी मध्यरात्री सुमारे १.३० वाजेच्या सुमारास आमोदा गावाजवळील पुलाजवळ त्यांच्या कारवरील नियंत्रण अचानक सुटले. भरधाव वेगातील कार थेट रस्त्याशेजारील झाडावर जोरात आदळली. हा अपघात अत्यंत भीषण होता.

या अपघातात प्रवीण कोल्हे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तर कारमधील इतर महिला सदस्य किरकोळ जखमी झाल्या. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य करत जखमींना रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना रविवारी दि. १७ मे रोजी पहाटे प्रवीण कोल्हे यांची प्राणज्योत मालवली.

प्रवीण कोल्हे हे सन २००३ पासून गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये कार्यरत होते. शांत, मनमिळावू आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनामुळे शैक्षणिक, सामाजिक तसेच मित्रपरिवारात शोककळा पसरली असून विविध स्तरांतून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.