दिघोडे येथे संत निरंकारी मिशनचा भव्य सत्संग सोहळा उत्साहात संपन्न
दिघोडे येथे संत निरंकारी मिशनचा भव्य सत्संग सोहळा उत्साहात संपन्न
उरण:सुनिल ठाकूर- दिघोडे येथे संत निरंकारी मिशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेला विशाल संत निरंकारी सत्संग कार्यक्रम भक्तिमय वातावरणात आणि उत्साहपूर्ण उपस्थितीत संपन्न झाला. ज्ञानप्रचारक परमपूज्य आदरणीय विश्वास भोसले जी (मुंबई) यांच्या सानिध्यात पार पडलेल्या या कार्यक्रमाला परिसरातील शेकडो भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमस्थळी सेवा दलाच्या स्वयंसेवकांनी अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने वाहतूक नियंत्रण, बैठक व्यवस्था तसेच पिण्याच्या पाण्याची उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करून दिली होती. संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून गेला होता.
सत्संगाची सुरुवात निरंकारी भक्तांनी सादर केलेल्या मधुर भक्तीगीतांनी झाली. त्यानंतर संत महात्म्यांनी अध्यात्म, मानवता, प्रेमभाव आणि समाजातील ऐक्य यावर प्रभावी मार्गदर्शन केले. “ईश्वर एक आहे आणि मानव सेवा हीच खरी भक्ती आहे,” असा मानवतेचा संदेश यावेळी देण्यात आला.
आजच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनात सकारात्मक विचार, सद्गुरूंचे ज्ञान आणि मानवतेची भावना समाजाला योग्य दिशा देऊ शकते, असे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले. समाजातील वाढते मतभेद, व्यसनाधीनता आणि तणाव दूर करण्यासाठी अध्यात्माची गरज असल्याचे संत महात्म्यांनी सांगितले. या सत्संगामध्ये महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. अनेक भक्तांनी सत्संगामुळे जीवनात घडलेल्या सकारात्मक बदलांचे अनुभव व्यक्त करत आत्मिक समाधान मिळाल्याची भावना मांडली. यावेळी संत निरंकारी मिशनच्या आगामी सामाजिक आणि आध्यात्मिक उपक्रमांची घोषणाही करण्यात आली. शांतता, शिस्त आणि भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाची सांगता सर्व उपस्थितांना महाप्रसाद वितरणाने करण्यात आली.
सकार्यक्रमास आयोजक दत्त्ताराम पाटील (संत निरंकारी सत्संग उरण सेक्टर 19 संयोजक,), कुलदीप जयवंत म्हात्रे (संत निरंकारी सत्संग दिघोडे ), काशिनाथ कासकर, चंद्रकांत म्हात्रे, हरिदास पाटील, सचिन पाटील आदी सह परिसरातील भक्त गण मोठ्या संख्येने उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्या नाहीत