Contact Banner

नशिराबादमध्ये अवैध गोवंश कत्तल प्रकरण उघड; ९ आरोपींवर गुन्हा, १२.२० लाखांचा मुद्देमाल जप्त

 

illegal-cattle-slaughter-case-busted-in-nashirabad-9-accused-booked-property-worth-12-lakh-seized

नशिराबादमध्ये अवैध गोवंश कत्तल प्रकरण उघड; ९ आरोपींवर गुन्हा, १२.२० लाखांचा मुद्देमाल जप्त

मध्यरात्री पोलिसांचा छापा; जनावरे, मांस आणि वाहने ताब्यात


*नशिराबादमध्ये अवैध गोवंश कत्तल प्रकरण उघड; ९ आरोपींवर गुन्हा, १२.२० लाखांचा मुद्देमाल जप्त >>* https://www.lewajagat.com/2026/05/illegal-cattle-slaughter-case-busted-in-nashirabad-9-accused-booked-property-worth-12-lakh-seized.html


लेवाजगत न्यूज | नशिराबाद
जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गोवंश कत्तल प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत ९ आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत तब्बल १२ लाख २० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, अवैध कत्तल करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

२८ मे रोजी नशिराबाद पोलीस ठाण्याच्या प्रभारी महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे या आपल्या पथकासह पेट्रोलिंग करत असताना, फातेमा नगर परिसरात परवीन कुरेशी, मुक्तार कुरेशी यांच्यासह काही इसम अवैधरित्या गोवंश जनावरांची कत्तल करत असल्याची गुप्त माहिती मिळाली. माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी तात्काळ छापा टाकण्याचे आदेश दिले.

त्यानुसार, सपोनि योगिता नारखेडे यांनी मध्यरात्री पथकासह संबंधित ठिकाणी अचानक धाड टाकली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी ९ आरोपींना जागीच ताब्यात घेतले. तसेच गोवंशाची कत्तल होण्यापूर्वीच कारवाई करून ३ गायी, १ बैल, ९ गोऱ्हे, २ लहान वासरे आणि सुमारे २०० किलो गोवंश सदृश्य मांस जप्त करण्यात आले.

याशिवाय मांस वाहतूक आणि विक्रीसाठी वापरण्यात आलेली वाहनेही पोलिसांनी जप्त केली. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत १२ लाख २० हजार ९०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हरेष पाटील करीत आहेत.

कारवाईत या अधिकाऱ्यांचा सहभाग

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

कारवाईत महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक रविंद्र तायडे, हरेष पाटील, सहाय्यक फौजदार शरद सोनार, राजेश मेंढे, पोहेकॉ चंद्रकांत पाटील, गुणवंत देशमुख, प्रशांत विरणारे, कमलाकर बागुल तसेच पोलीस कर्मचारी भरत बाविस्कर, पंकज सोनवणे, विठ्ठल मुंढे, सागर बिडे, विजय अहिरे, भुषण पाटील आणि रामकृष्ण माळी यांनी सहभाग घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.