आज अधिकृत घोषणा? जळगावची जागा भाजपच लढवणार; डॉ. केतकी पाटील उमेदवार होण्याची शक्यता
आज अधिकृत घोषणा?
जळगावची जागा भाजपच लढवणार; डॉ. केतकीताई पाटील उमेदवार होण्याची शक्यता
लेवाजगत न्यूज सावदा-
स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून दिल्या जाणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी जळगाव मतदारसंघात महायुतीतील जागावाटपाचा तिढा अद्याप कायम असला, तरी ही जागा भारतीय जनता पक्षच लढवणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. भाजपकडून गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या डॉ. केतकीताई पाटील यांचे नाव आघाडीवर असून त्यांना उमेदवारी मिळण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. कोणत्याही क्षणी याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विधान परिषद निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर जळगावातून उमेदवारी कुणाला मिळणार याबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. शिवसेनेकडून पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांचे नाव चर्चेत होते. तसेच आमदार किशोर पाटील यांचे पुत्र व नगरसेवक सुमीत पाटील यांचे नावही संभाव्य उमेदवारांमध्ये घेतले जात होते.
दुसरीकडे भाजपकडूनही अनेक इच्छुकांची नावे पुढे आली होती. यामध्ये तांदलवाडी येथील माजी जिल्हापरिषद उपाध्यक्ष नंदकुमार महाजन ,उद्योजक नंदू अडवाणी, पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. राजेंद्र फडके, डॉ. केतकीताई पाटील, पाचोरा येथील पदाधिकारी अमोल शिंदे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक कांडेलकर आदींचा समावेश होता. भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनीदेखील निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली असल्याची चर्चा आहे.
या सर्व राजकीय घडामोडींमध्ये डॉ. केतकीताई पाटील यांचे नाव आघाडीवर असल्याचे स्पष्ट होत आहे. माजी खासदार डॉ. उल्हासदादा पाटील यांच्या कन्या असलेल्या डॉ. केतकीताई यांनी दोन वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सक्रिय राजकारणात पदार्पण केले. अल्पावधीत त्यांनी जिल्हाभरात प्रभावी जनसंपर्क निर्माण करत आपल्या कामाची छाप उमटवली आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या नावाला हिरवा कंदील दिल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकच्या जागांसाठी शिवसेना (शिंदे गट) आग्रही असल्याने महायुतीतील चर्चांना वेग आला आहे. नाशिकची जागा भाजपकडेच राहावी, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याचे सांगितले जात आहे. नाशिकची जागा शिवसेनेकडे गेल्यास भाजप मैत्रीपूर्ण लढतीचा पर्याय स्वीकारू शकतो, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
जळगावातही शिवसेनेच्या आमदारांनी आग्रह कायम ठेवल्यास भाजप विरुद्ध शिवसेना अशी मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे बोलले जात आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत