पेट्रोल-डिझेल तुटवड्याबाबत जळगाव जिल्ह्यात अफवांवर विश्वास ठेवू नका : जिल्हा प्रशासनाचे आवाहन
पेट्रोल-डिझेल तुटवड्याबाबत जळगाव जिल्ह्यात अफवांवर विश्वास ठेवू नका : जिल्हा प्रशासनाचे आवाहन
लेवाजगत न्यूज जळगाव : जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याच्या अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरत असताना जिल्हा प्रशासनाने नागरिकांना शांतता आणि संयम राखण्याचे आवाहन केले आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय, जळगाव यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा आणि नियमित साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रशासनाने सांगितले की, जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पेट्रोल किंवा डिझेलचा कोणताही तुटवडा निर्माण झालेला नाही. इंधन पुरवठा साखळी सुरळीतपणे सुरू असून संबंधित यंत्रणांकडून सातत्याने देखरेख ठेवण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊन पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी करू नये किंवा मोठ्या प्रमाणात इंधन साठवण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना खालील बाबींची विशेष दक्षता घेण्यास सांगितले आहे :
- सोशल मीडियावरील अप्रमाणित संदेश किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये.
- भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल-डिझेल खरेदी करू नये.
- पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी टाळावी.
- चुकीची माहिती प्रसारित करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- अधिकृत शासकीय माध्यमांवरील माहितीवरच विश्वास ठेवावा.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, २० मे २०२६ रोजी जिल्ह्यातील विविध तेल कंपन्यांकडे मोठ्या प्रमाणात इंधन साठा उपलब्ध आहे. एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसीएल, नायरा आणि रिलायन्स या कंपन्यांकडे पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा असून पुरवठा नियमित सुरू आहे.
नागरिकांना काही तक्रार अथवा शंका असल्यास ०२५७-२२२३१८० या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा dsojalgaon1@gmail.com या ई-मेलवर माहिती द्यावी, असे प्रशासनाने कळविले आहे.
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नागरिकांना अफवांपासून दूर राहून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत