Contact Banner

विवाहाच्या १५ दिवसांत आत्महत्या; पत्नी व प्रियकराविरुद्ध गुन्हा संशयित प्रियकराला न्यायालयाकडून तीन दिवसांची पोलिस कोठडी

 

suicide-within-15-days-of-marriage-case-filed-against-wife-and-lover

विवाहाच्या १५ दिवसांत आत्महत्या; पत्नी व प्रियकराविरुद्ध गुन्हा

संशयित प्रियकराला न्यायालयाकडून तीन दिवसांची पोलिस कोठडी

प्रतिनिधी | यावल

तालुक्यातील एका गावातील २६ वर्षीय नवविवाहित तरुणाने लग्नानंतर अवघ्या १५ दिवसांत विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीचे लग्नापूर्वीचे प्रेमसंबंध आणि तिच्या प्रियकराकडून मिळणाऱ्या धमक्यांमुळे तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी यावल पोलिसांनी मृत तरुणाच्या पत्नी व तिच्या प्रियकराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, प्रियकराला अटक करण्यात आली आहे.

मृत तरुणाचा विवाह अवघ्या १५ दिवसांपूर्वी एका तरुणीसोबत झाला होता. मात्र, विवाहानंतरही पत्नी ही तिचा प्रियकर विशाल युवराज पाटील याच्याशी सतत संपर्कात असल्याचे समोर आले. दोघांमध्ये वारंवार फोनवर संभाषण होत असल्याची माहिती पतीला मिळाली होती.

दरम्यान, १३ मे रोजी संबंधित तरुणाचा मृतदेह गावालगतच्या शेतातील विहिरीत आढळून आला. मृत्यूनंतर घरात सापडलेल्या चिठ्ठीतून आत्महत्येमागील कारणांचा उलगडा झाला. पत्नीचा प्रियकर विशाल पाटील हा सोशल मीडियावरून मेसेज पाठवत मृत तरुणाला सतत जीवे मारण्याच्या व बदनामीच्या धमक्या देत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या मानसिक त्रासाला कंटाळून तरुणाने अखेर आत्महत्या केल्याचे समोर आले.

या प्रकरणी मृत तरुणाच्या बहिणीने यावल पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी मृत तरुणाची पत्नी आणि तिचा प्रियकर विशाल युवराज पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

गुन्ह्यातील मुख्य आरोपी विशाल पाटील याला पोलिसांनी अटक करून यावल येथील न्यायालयात हजर केले. न्यायाधीश जी. आर. कोतले यांनी आरोपीला २२ मेपर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार वसंतकुमार बेलदार करीत आहेत. पोलिसांकडून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.