Contact Banner

नव्या संसारावर काळाचा घाला; जळगावात उष्माघाताने नवविवाहितेसह पुजाऱ्याचा मृत्यू

 

jalgaon-heatstroke-death-newlywed-woman-priest-tragic-incident

नव्या संसारावर काळाचा घाला; जळगावात उष्माघाताने नवविवाहितेसह पुजाऱ्याचा मृत्यू

लेवाजगत न्यूज जळगांव- जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून तापमानाने तब्बल ४५.६ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला आहे. प्रचंड उकाडा, अंगाची लाही लाही करणारे ऊन आणि उष्ण वाऱ्यांमुळे दोन जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये अवघ्या २० दिवसांपूर्वी विवाह झालेल्या नवविवाहित तरुणीचा तसेच एका ६९ वर्षीय मंदिर पुजाऱ्याचा समावेश असल्याने जिल्हाभर हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बाळद (ता. भडगाव) येथील माहेर असलेल्या वैशाली सुनील मोरे (वय २०) यांचा विवाह अवघ्या २० दिवसांपूर्वी मोहाडी (ता. जामनेर) येथील सुनील बाळू मोरे यांच्यासोबत मोठ्या उत्साहात पार पडला होता. नव्या संसाराची स्वप्ने रंगवत असतानाच काळाने अचानक घाला घातल्याने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मंगळवारी वैशाली आणि त्यांचे पती सुनील हे चोपडा तालुक्यातील एका लग्न समारंभासाठी दुचाकीने गेले होते. जिल्ह्यात तीव्र उष्णता असतानाही त्यांनी दुपारच्या कडक उन्हात प्रवास केला. समारंभ आटोपून सायंकाळी घरी परतल्यानंतर वैशाली यांना प्रचंड थकवा जाणवत होता. बुधवारी सकाळी घरातील कामे करताना आणि गॅसजवळ स्वयंपाक करत असताना त्यांना मळमळ, अशक्तपणा आणि चक्कर येऊ लागली. काही वेळातच त्यांची प्रकृती गंभीर झाली.

कुटुंबीयांनी तातडीने त्यांना नेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात येत असताना रुग्णवाहिकेतच त्यांची प्राणज्योत मालवली.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उपचारासाठी आणले तेव्हा त्यांच्या शरीराचे तापमान सुमारे १०४ अंश होते. उन्हात दीर्घकाळ प्रवास आणि त्यानंतर उष्ण वातावरणात काम केल्यामुळे उष्माघाताचा तीव्र परिणाम झाल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, जिल्ह्यातील वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांना अत्यावश्यक कामांशिवाय दुपारच्या वेळेत बाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. डॉक्टरांनी भरपूर पाणी पिणे, डोक्यावर संरक्षण ठेवणे आणि उन्हात दीर्घकाळ प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.