Contact Banner

जळगाव विधानपरिषदेसाठी महायुतीत रस्सीखेच; शिंदेसेना विरुद्ध भाजप, प्रताप पाटील-सुमित पाटील तर भाजपकडून केतकीताई पाटील व नंदकुमार महाजन चर्चेत

 

jalgaon-legislative-council-election-mahayuti-conflict-shiv-sena-bjp

जळगाव विधानपरिषदेसाठी महायुतीत रस्सीखेच; शिंदेसेना विरुद्ध भाजप, प्रताप पाटील-सुमित पाटील तर भाजपकडून केतकीताई पाटील व नंदकुमार महाजन चर्चेत

लेवाजगत न्यूज जळगाव : विधानपरिषदेच्या निवडणुकीची घोषणा होताच जळगाव जिल्ह्यात महायुतीतील राजकीय हालचालींना वेग आला असून भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाल्याचे चित्र आहे. एका बाजूला पालकमंत्री यांचे पुत्र प्रताप पाटील यांचे नाव चर्चेत असताना, दुसऱ्या बाजूला पाचोऱ्याचे आमदार यांच्या गटाने त्यांचे पुत्र सुमित पाटील यांना पुढे करत दावेदारी अधिक मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, भाजपनेही या जागेवर ठाम दावा करत आणि यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू केली आहे.

महायुतीत जळगाव विधानपरिषद मतदारसंघाची जागा नेमकी कोणाला मिळणार, याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी शिवसेना शिंदे गटाने या जागेवर आपला दावा कायम ठेवला आहे. गेल्या काही दिवसांपासून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या राजकीय प्रभावामुळे प्रताप पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक असल्याचे बोलले जात होते. जिल्ह्यातील संघटनात्मक ताकद, मंत्रीपदाचा प्रभाव आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जाळे या बळावर त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात होती.

मात्र, आता पक्षांतर्गत समीकरणांमध्ये बदल होत असल्याचे दिसत आहे. आमदार किशोर पाटील समर्थकांनी स्वतंत्र मोर्चेबांधणी सुरू केली असून विधानपरिषद निवडणुकीतील मतांच्या गणिताच्या आधारे दावा अधिक आक्रमकपणे पुढे केला जात आहे.

कोण कुठे मजबूत?

जळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतांचे विश्लेषण करताना पाचोरा-भडगाव मतदारसंघात आमदार किशोर पाटील यांचे पारडे जड असल्याचे त्यांचे समर्थक सांगत आहेत. पाचोरा नगरपालिकेत शिंदेसेनेचे २२ नगरसेवक, दोन स्वीकृत सदस्य आणि नगराध्यक्ष असे मिळून २५ मते असल्याचे सांगितले जात आहे. भडगाव नगरपालिकेत १९ नगरसेवक, दोन स्वीकृत सदस्य आणि नगराध्यक्ष मिळून २२ मते शिंदेसेनेकडे आहेत. या दोन्ही नगरपालिका धरून तब्बल ४७ मते आमदार किशोर पाटील यांच्या प्रभावक्षेत्रातील असल्याचा दावा केला जात आहे.

दुसरीकडे, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तुलनेने कमी ताकद असल्याचा मुद्दा विरोधी गटातून पुढे केला जात आहे. नशिराबाद नगरपालिकेत शिंदेसेनेकडे नऊ नगरसेवक आणि एक स्वीकृत सदस्य असे मिळून १० मते आहेत. तर धरणगाव नगरपालिकेत भाजप-शिंदेसेना युती असली तरी निवडणूक ‘जनविकास आघाडी’च्या माध्यमातून लढविण्यात आली होती. त्यामुळे तेथील सर्व विजयी सदस्य शिंदे गटाचे मानता येणार नाहीत, असा मुद्दा पुढे केला जात आहे.

भाजपचाही वाढता दावा

दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपकडे अधिक मतदान असल्याचा दावा भाजप पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे. केतकीताई पाटील आणि नंदकुमार महाजन यांनी विविध पालिका निवडणुकांमध्ये नगरसेवक निवडून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगितले जात असून त्यांच्या समर्थक नगरसेवकांची संख्या देखील लक्षणीय असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. त्यामुळे विधानपरिषदेसाठी भाजपचा दावा अधिक मजबूत झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

महायुतीत ही जागा अखेर भाजपकडे जाणार की शिवसेना शिंदे गटाकडे, याकडे आता जिल्ह्यातील नगरसेवकांचे लक्ष लागले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतांचे गणित, पक्षनिहाय ताकद आणि वरिष्ठ पातळीवरील राजकीय समीकरणांवरच उमेदवारीचे भवितव्य अवलंबून राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

बिनविरोध निवडणुकीची चर्चा; नगरसेवक नाराज?

दरम्यान, ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त होत असली तरी त्याबाबत अनेक नगरसेवकांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याचेही बोलले जात आहे. स्थानिक पातळीवर मेहनत घेऊन मतांचे जाळे उभे करणाऱ्या नगरसेवकांना निवडणुकीत प्रत्यक्ष भूमिका बजावण्याची अपेक्षा असते. त्यामुळे जर वरिष्ठ पातळीवर तडजोड होऊन निवडणूक बिनविरोध झाली, तर कार्यकर्ते आणि नगरसेवकांमध्ये कमालीची नाराजी निर्माण होऊ शकते, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

दरम्यान, या सर्व घडामोडींचा संदेश पक्षाचे प्रमुख नेते तथा उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. महायुतीतील जागावाटपाचा अंतिम निर्णय अद्याप प्रलंबित असल्याने इच्छुक उमेदवारांची धावपळ वाढली असून आगामी काही दिवसांत मुंबईतील पक्षश्रेष्ठींच्या बैठका आणि स्थानिक पातळीवरील राजकीय हालचालींना आणखी वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.