जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल, आवरेचा एसएससी निकाल शंभर टक्के
जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल, आवरेचा एसएससी निकाल शंभर टक्के
आवरे प्रतिनिधी (सचिन पाटील) : “विद्वान सर्वत्र पूज्यते” या उक्तीप्रमाणे राजाचा सन्मान राजवाड्यात, धनवानांचा धनिकांमध्ये होत असला तरी विद्वानांचा आदर सर्वत्र केला जातो. याच विचारांची परंपरा जपत आवरे येथील स्वर्गीय अशोक ठाकूर सर यांच्या स्वप्नातील विद्यालय असलेल्या जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूलने यंदाही एसएससी परीक्षेत शंभर टक्के निकालाची गौरवशाली परंपरा कायम राखली आहे.
फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (एसएससी) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून विद्यालयाचा निकाल यावर्षीदेखील १०० टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनतीचे हे यश असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
यंदा समान गुण मिळाल्यामुळे दोन विद्यार्थिनींनी संयुक्तरीत्या प्रथम क्रमांक पटकावला आहे. कुमारी दिक्षा उदय म्हात्रे व कुमारी श्रुती ऋषिकेश म्हात्रे यांनी प्रत्येकी ८२.२० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळविला. द्वितीय क्रमांक कुमारी कार्तिकी भारत पाटील हिने ८०.४० टक्के गुणांसह प्राप्त केला, तर कुमारी भक्ती आयोध्या म्हात्रे हिने ७८ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला.
यावर्षी विद्यालयातून एकूण २३ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. विशेष म्हणजे सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा अबाधित ठेवली आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल त्यांचे तसेच त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या पालकांचे विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे. आत्माराम ठाकूर मिशन संस्थेचे अध्यक्ष प्रतिक ठाकूर, खजिनदार वामन ठाकूर, विश्वस्त अलका ठाकूर, सिंधू ठाकूर, आदिनाथ ठाकूर, प्रसाद ठाकूर, रीना ठाकूर, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निकिता म्हात्रे मॅडम, शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.
विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यंदाचा हा यशस्वी निकाल संस्थेचे संस्थापक व माजी अध्यक्ष स्वर्गीय अशोक ठाकूर सर यांना समर्पित केला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत