जेजुरी गडावर भेसळयुक्त भंडाऱ्याचा सुळसुळाट; भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
जेजुरी गडावर भेसळयुक्त भंडाऱ्याचा सुळसुळाट; भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
शुद्ध धार्मिक परंपरेला भेसळीचे ग्रहण; कारवाईअभावी संताप, सामाजिक कार्यकर्त्यांचा इशारा
उरण : सुनिल ठाकूर-महाराष्ट्राचे कुलदैवत तसेच भारतीय लोकदैवत म्हणून प्रसिद्ध असलेल्या या तीर्थक्षेत्राची ओळख पिवळ्या शुभ्र भंडाऱ्यामुळे जगभर पोहोचली आहे. मात्र या पवित्र, शुद्ध धार्मिक आणि औषधी महत्त्व असलेल्या भंडाऱ्याला आता भेसळीचे ग्रहण लागल्याचे चित्र स्पष्टपणे समोर येत आहे. जेजुरी गडावर भेसळयुक्त भंडाऱ्याची विक्री आणि वापर वाढत असून प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे भाविकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
स्थानिक ग्रामस्थ, विविध प्रतिष्ठान मंडळे, खांदेकरी, मानकरी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून भेसळयुक्त भंडाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी स्थानिक प्रशासन, राजकीय नेते आणि यांच्याकडे सातत्याने केली आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
उन्हाळी सुट्ट्या तसेच कुलधर्म-कुलाचारासाठी राज्यासह परराज्यातून आलेल्या भाविकांच्या प्रचंड गर्दीदरम्यान मंदिर परिसरात ‘मोर छाप भंडारा’ नावाच्या पिशव्या आढळून आल्या. या पिशव्यांमध्ये काळसर रंगाची रांगोळी मिसळल्याचे निदर्शनास आले असून हा भेसळयुक्त भंडारा मोठ्या प्रमाणावर उधळण्यात आल्याचे समोर आले आहे. संबंधित कंपनी सांगली येथील असल्याची माहिती पिशवीवरील तपशीलावरून स्पष्ट झाली आहे.
विशेष म्हणजे, या प्रकाराबाबत देवस्थान प्रशासनाने अद्याप कोणतीही नोटीस, सूचना किंवा तक्रार दाखल केलेली नाही. त्यामुळे भाविकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कपाळाला लावला जाणारा आणि मोठ्या प्रमाणावर उधळला जाणारा हा भंडारा डोळ्यात किंवा तोंडात गेल्यास गंभीर आरोग्यधोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यापूर्वीही भेसळयुक्त भंडाऱ्यामुळे जेजुरीतील नंदी चौक आणि महाद्वार परिसरात भंडाऱ्याचा स्फोट होऊन अनेक नागरिक जखमी झाले होते. तरीदेखील या प्रकाराकडे प्रशासन आणि देवस्थान ट्रस्ट गांभीर्याने पाहत नसल्याची खंत सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
जेजुरी मार्तंड देवस्थानचे माजी विश्वस्त प्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते यांनी या भेसळयुक्त भंडाऱ्याच्या काळ्या बाजाराविरोधात उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र प्रशासनाच्या नाकाखालीच हा अवैध प्रकार सुरू असल्याने भविष्यात मोठी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित होत आहे.
भंडाऱ्याच्या प्रश्नावर विधानसभेत आवाज उठूनही कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. उलट काही मंत्र्यांनी इतर गौण विषयांकडे लक्ष केंद्रित केले, मात्र शुद्ध हळदीचे उत्पादन वाढवून भेसळ रोखण्यासाठी आवश्यक पावले उचलली गेली नसल्याची टीका होत आहे.
खंडोबाच्या मंदिरावर भंडाऱ्याची उधळण ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक परंपरेचा अविभाज्य भाग मानली जाते. आयुर्वेदिकदृष्ट्याही हळदीला विशेष महत्त्व आहे. मात्र वाढत्या भेसळीमुळे या पवित्र परंपरेलाच धोका निर्माण झाला असून वेळेत कठोर कारवाई न झाल्यास मोठा अनर्थ घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत