पावसाळी अधिवेशनाआधी विधान परिषद निवडणुकीचा बिगुल; १७ जागांसाठी १८ जूनला मतदान
पावसाळी अधिवेशनाआधी विधान परिषद निवडणुकीचा बिगुल; १७ जागांसाठी १८ जूनला मतदान
मुंबई : पावसाळी अधिवेशनाआधी महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्यसंख्येत आणखी भर पडणार असून, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील १७ जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकांसाठी १८ जून रोजी मतदान तर २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे. विशेष म्हणजे, एकूण १७ जागांपैकी १६ जागांवर नियमित निवडणूक होणार असून, नागपूर विधान परिषद मतदारसंघात पोटनिवडणूक पार पडणार आहे. महसूलमंत्री यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्यामुळे अनेक मतदारसंघांतील आमदारांचा कार्यकाळ संपुष्टात येऊनही निवडणुका होऊ शकल्या नव्हत्या. परिणामी, गेल्या दोन-अडीच वर्षांपासून या जागा रिक्त आहेत. विधान परिषदेतील एकूण ७८ सदस्यांपैकी २२ सदस्य हे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून येतात. संबंधित मतदारसंघातील किमान ७५ टक्के मतदारसंख्या उपलब्ध असल्यास निवडणूक घेण्याची तरतूद आहे.
निवडणुकीच्या जाहीर वेळापत्रकानुसार, २५ मे रोजी अधिसूचना जारी केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १ जून असेल. त्यानंतर २ जून रोजी अर्जांची छाननी केली जाईल, तर ४ जूनपर्यंत उमेदवारांना अर्ज माघारी घेता येणार आहेत. १८ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार असून, २२ जून रोजी मतमोजणी पार पडणार आहे.
या निवडणुका सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली, छत्रपती संभाजीनगर-जालना आणि नागपूर या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमध्ये पार पडणार आहेत.
महाराष्ट्र विधान परिषदेची एकूण सदस्यसंख्या ७८ असून, त्यापैकी ३० सदस्य विधानसभेतील आमदारांकडून निवडले जातात. तसेच २२ सदस्य स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून, ७ सदस्य पदवीधर मतदारसंघातून आणि ७ सदस्य शिक्षक मतदारसंघातून निवडून येतात. उर्वरित १२ सदस्यांची नियुक्ती राज्यपालांकडून केली जाते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत