Contact Banner

औषध विक्रेत्यांचा २० मे रोजी बंद;नागरिकांनी अत्यावश्यक औषधांची आगाऊ व्यवस्था करून ठेवावी - अन्न व औषध प्रशासन

 

aushadh-vikrete-bandh-20-me-atyavashyak-aushadhe-agrau-vyavastha-fda


औषध विक्रेत्यांचा २० मे रोजी बंद;नागरिकांनी अत्यावश्यक औषधांची आगाऊ व्यवस्था करून ठेवावी - अन्न व औषध प्रशासन

जळगाव, दि. 15  – आखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने देशात व राज्यात संपुर्ण भारतभर औषध विक्रेत्यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या  संदर्भात  दि. २० मे २०२६, रोजी देशातील सर्व ठोक व किरकोळ औषध विक्रीचे व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.


 त्यामुळे शहरातील जिल्ह्यातील अनेक औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी अत्यावश्यक औषधे व वैद्यकीय साहित्य यांची आगाऊ व्यवस्था करून घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. 


दरम्यान, आपत्कालीन सेवा, शासकीय रुग्णालये तसेच काही निवडक औषध दुकाने सुरू राहण्याची शक्यता आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी औषध प्रशासन व पोलीस विभागाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.


या पार्श्वभुमीवर, सहायक आयुक्त (औषधे), अन्न व औषध प्रशासन, जळगाव यांनी केमिस्ट बांधवांना आवाहन केले आहे की, या बंदमध्ये सहभागी  होऊ नये. औषधे ही अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५ अंतर्गत येत असल्याने रुग्णांना औषधांचा पुरवठा न करणे हे कायद्याचे उल्लंघन ठरू शकते, अशा सूचनाही त्यांना देण्यात आल्या आहेत. तसेच औषध किंमत नियंत्रण आदेश २०१३ व औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० अंतर्गत नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.


रुग्णांना औषधांच्या अभावामुळे कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी संघटनांनी योग्य खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाने नमूद केले आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत औषधे उपलब्ध न झाल्यास सहायक आयुक्त (औषधे) डॉ. प्र.भा. अस्वार – मो. ९४२२३५६१४३ व  श्रीमती क. र. पाटील – मो. ९८६०१७२५६१ यांच्याशी संपर्क साधावा व नागरिकांनी शांतता व संयम राखून औषध प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.