Contact Banner

नैसर्गिक पाणी प्रवाह रोखल्याने पूरस्थितीची भीती चिर्ले-दिघोडे व गव्हाण फाटा-चिरनेर रस्ते पाण्याखाली जाण्याची शक्यता; सा.बा. विभागाच्या दुर्लक्षाचा आरोप

 

natural-water-flow-blocked-flood-risk-chirle-dighode-chirner-roads

नैसर्गिक पाणी प्रवाह रोखल्याने पूरस्थितीची भीती

चिर्ले-दिघोडे व गव्हाण फाटा-चिरनेर रस्ते पाण्याखाली जाण्याची शक्यता; सा.बा. विभागाच्या दुर्लक्षाचा आरोप

उरण | सुनिल ठाकूर

उरण तालुक्यात खासगी यार्ड मालकांकडून करण्यात आलेल्या अवैध भराव आणि बांधकामांमुळे आगामी पावसाळ्यात मोठ्या पूरस्थितीचा धोका निर्माण झाला असून, चिर्ले-दिघोडे तसेच गव्हाण फाटा-चिरनेर हे महत्त्वाचे रस्ते पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल प्रशासन आणि ग्रामपंचायत प्रशासनावर जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही खासगी व्यावसायिक आणि यार्ड मालकांनी रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात दगड, मुरूम आणि मातीचा भराव टाकून नैसर्गिक पाण्याचे मार्ग बंद केले आहेत. अनेक ठिकाणी मोऱ्यांच्या लगत भिंती उभारण्यात आल्याने ओढ्यांचा नैसर्गिक प्रवाह बदलला आहे. परिणामी पावसाळ्यात पाणी साचून रस्ते वाहतुकीसाठी बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, चिर्ले, दिघोडे, वेश्वी, चिरनेर, विंधने, कोप्रोली, पिरकोन, सारडे, वशेणी आणि बांधपाडा परिसरात मोठ्या प्रमाणावर भराव टाकून शेती आणि खाडीकिनारी भागाचे नुकसान केले जात आहे. यामुळे पर्यावरणीय समतोल बिघडत असून भविष्यात मोठ्या संकटाला सामोरे जावे लागू शकते.

विशेष म्हणजे, या रस्त्यांवरील मोऱ्यांची पावसाळ्यापूर्वी साफसफाई आणि दुरुस्ती करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असताना याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. काही ठिकाणी नव्याने टाकण्यात आलेल्या पाइपलाइन मोऱ्यांच्या खाली न टाकता थेट अडथळा निर्माण करतील अशा पद्धतीने टाकण्यात आल्याचेही निदर्शनास आले आहे. तसेच रस्त्याच्या उंचीपेक्षा वर गटारे बांधल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होत आहे.

या सर्व मानवनिर्मित बदलांचा परिणाम म्हणून चिर्ले-दिघोडे मार्गासह दादरपाडा आणि वेश्वी गावात पाणी शिरण्याचा धोका वाढला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संभाव्य पूरस्थितीमुळे जीवित व वित्तहानीसह जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


“उरण तालुक्यात पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असतो. काही खासगी विकासकांनी नैसर्गिक ओढ्यांवर भिंती बांधून पाण्याचा प्रवाह बदलला आहे. त्यामुळे शासकीय नियमांचा फज्जा उडाला आहे. आता जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि संबंधित यंत्रणा यावर कडक कारवाई करतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.”
बी. एम. ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.