निंबोल गावात चोरट्यांचा धुमाकूळ; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
निंबोल गावात चोरट्यांचा धुमाकूळ; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
लेवाजगत न्यूज रावेर -तालुक्यातील निंबोल येथे चोरट्यांचा सुळसुळाट वाढत असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांनी ग्रामपंचायत कार्यालय फोडून डीव्हीआर तसेच सोसायटीतील कॅमेरे फोडल्याची घटना घडली आहे. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने ही तोडफोड करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
याशिवाय गावातील अनेक घरांमध्ये चोरी व घरफोडीच्या घटना घडल्या असून, घरात रहिवासी असतानाही चोरट्यांनी धाडसाने घरफोड्या केल्याचे समोर आले आहे. मागील सहा महिन्यांत सुमारे १० ते १५ चोरी व घरफोडीच्या घटना घडल्याची माहिती मिळत आहे. सतत वाढणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात असुरक्षिततेची भावना पसरली आहे.
रात्रीच्या वेळी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून अनेकांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. सुदैवाने अद्याप कोणताही रहिवासी चोरट्यांच्या तावडीत सापडलेला नसला तरी भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
ग्रामस्थांनी पोलिस प्रशासनाकडे गावात नियमित गस्त वाढविणे, संशयितांवर लक्ष ठेवणे तसेच चोरट्यांना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पुढील तपास सुरू केला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत