यावल तालुक्यात ‘पॉलिश गॅंग’ सक्रिय; विरोदा येथील अनेक महिलांना घातला गंडा
यावल तालुक्यात ‘पॉलिश गॅंग’ सक्रिय; विरोदा येथील अनेक महिलांना घातला गंडा
विरोदा, ता. ९ मे २०२६ (सतीश बर्हाटे प्रतिनिधी) : दागिने तसेच तांब्या-पितळाच्या भांड्यांना पॉलिश करून चमकवण्याचा दावा करणारी ‘पॉलिश गॅंग’ सध्या यावल तालुक्यात सक्रिय झाली असून, विरोदा गावात अनेक महिलांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी सकाळी ९ ते १० वाजण्याच्या सुमारास पाच ते सहा अज्ञात महिला रिक्षाने गावात आल्या होत्या. त्यांनी गल्लीबोळात फिरत महिलांना पॉलिश केलेली तांब्या-पितळाची भांडी तसेच सोन्या-चांदीचे दागिने दाखवून विश्वास संपादन केला.
“आम्ही तुमची भांडी फक्त १० ते २० रुपयांत पॉलिश करून देतो,” असे सांगत त्यांनी अनेक महिलांकडून तांब्या-पितळाची भांडी घेतली. तसेच “आम्ही पिंपरुळ फाट्यावर बसलो आहोत, उद्या पॉलिश करून भांडी परत आणून देतो,” असेही सांगितले.
मात्र, संबंधित महिला पिंपरुळ फाट्यावर आढळून आल्या नाहीत. दोन दिवस उलटूनही त्यांनी कोणत्याही महिलांची भांडी परत केली नसल्याने त्या भांडी घेऊन पसार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकारामुळे गावात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागरिकांसाठी सावधानतेचा इशारा
- अनोळखी महिला किंवा व्यक्तींना मौल्यवान वस्तू व दागिने पॉलिश करण्यासाठी देऊ नयेत.
- घरातील मौल्यवान वस्तूंवर कोणतीही रासायनिक प्रक्रिया करू देऊ नये.
- घरात एकटे असताना अनोळखी व्यक्तींशी संवाद टाळावा.
- संशयास्पद हालचाल किंवा अशा प्रकारची घटना आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत