पुण्यात सुनेच्या खुनानंतर फरार झालेला सासरा जळगावातून अटकेत
पुण्यात सुनेच्या खुनानंतर फरार झालेला सासरा जळगावातून अटकेत
पुण्यातील उच्चभ्रू नांदेड सिटी परिसरात सुनेची निर्घृण हत्या करून आठ दिवसांपासून फरार असलेल्या भानुदास भास्कर चौधरी या आरोपी सासऱ्याला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने शिताफीने अटक केली आहे. आरोपी जळगाव शहरात लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. या अटकेमुळे गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेला शोध अखेर संपुष्टात आला असून पुढील तपासासाठी आरोपीला पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील नांदेड सिटी परिसरात २ मे रोजी घरगुती वादातून भानुदास चौधरी याने आपली सून स्वाती तेजस चौधरी हिच्या डोक्यात गंभीर वार करून तिची हत्या केली होती. हत्या केल्यानंतर आरोपीने घराला बाहेरून कुलूप लावून घटनास्थळावरून पलायन केले होते. या प्रकरणी हवेली पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे पुणे शहरात मोठी खळबळ उडाली होती.
दरम्यान, आरोपीचा शोध सुरू असताना तो जळगाव शहरातील मेहरूण गाव परिसरात लपल्याची गोपनीय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महादेव मंदिर परिसरात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.
प्राथमिक चौकशीनंतर जळगाव पोलिसांनी आरोपी भानुदास चौधरी याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी पुणे पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. आठ दिवसांपासून फरार असलेला मुख्य आरोपी जेरबंद झाल्याने आता या गाजलेल्या खून प्रकरणाच्या तपासाला वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कौटुंबिक वादातून सासऱ्यानेच सुनेची हत्या केल्याच्या या धक्कादायक प्रकारामुळे नांदेड सिटी परिसरात अद्यापही भीती व खळबळीचे वातावरण कायम आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत