Contact Banner

उरण येथे नागरी संरक्षण दलातर्फे प्राथमिक पाठ्यक्रम संपन्न

 

uran-civil-defence-force-basic-training-course-completed

उरण येथे नागरी संरक्षण दलातर्फे प्राथमिक पाठ्यक्रम संपन्न

उरण : सुनिल ठाकूर
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागांतर्गत विशेष नागरी संरक्षण दल, उरण रायगड यांच्या वतीने नागरी संरक्षण प्राथमिक पाठ्यक्रमाचे आयोजन उपनियंत्रक केंद्र, बोरी (उरण) येथे करण्यात आले होते. या प्रशिक्षणामध्ये नागरी संरक्षण दलाची आवश्यकता, उद्देश व उपाययोजना, आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन, प्रथमोपचार, नियंत्रण व संदेशवहन, अडकलेल्या नागरिकांची सुटका व विमोचन आदी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच सीपीआर पद्धत, कृत्रिम श्वसन पद्धती, रुग्णाला वाहून नेण्याच्या विविध पद्धती, बँडेज, दोऱ्या व गाठींचे प्रकार, रुग्णशिबिकेबाबत माहिती आणि विविध प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षार्थींना शासनाचे ओळखपत्र, शासकीय प्रशिक्षण प्रमाणपत्र तसेच नागरी संरक्षण स्वयंसेवक सभासदत्व प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

समारोप कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य क्षेत्ररक्षक मा. नवीन राजपाल उपस्थित होते. त्यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करत देशसेवेचे महत्त्व पटवून दिले. यावेळी सहाय्यक उपनियंत्रक शशिकांत शिरसाठ तसेच वरिष्ठ स्वयंसेवक सलिम शेख, दौलत पाटील, निषाद मोकल, आयुष मोहिते, समीक्षा ठाकूर, प्रणाली सकपाळ, मानसी ठाकूर, वैदेही गावंड, रेशम कोळी, भूमी मोकल, उत्कर्षा गावंड आणि परमिन खान उपस्थित होते.

प्रशिक्षार्थींमधून लीडर आफ्रिन खान हिने मनोगत व्यक्त केले. रेश्मा खान हिने आपत्तीच्या काळात जीवितहानी व वित्तहानी कशी कमी करता येते याबाबत प्रशिक्षणातून प्रात्यक्षिकांसह महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळाल्याचे सांगितले. मुलांमधून इंगोले यांनी लीडर म्हणून जबाबदारी पार पाडली तर राजगे यांनी मनोगत व्यक्त केले.

या प्रशिक्षण वर्गात प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला असून जयेश पाटील याने द्वितीय क्रमांक पटकावला. तर आकाश मोरे आणि आकाश भिडे यांनी संयुक्तरीत्या तृतीय क्रमांक मिळवला.

सदर पाठ्यक्रम यशस्वीरीत्या राबविण्यासाठी विभागीय क्षेत्ररक्षक तथा मानसेवी निर्देशक हरेश्वर ठाकूर यांनी विशेष परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन करताना त्यांनी “देशसेवा करण्यासाठी ही पहिली पायरी आहे. संकट कोणतेही सांगून येत नाही, दक्षता कधीही व्यर्थ जात नाही. नागरिक ही करेंगे नागरिकों की रक्षा,” असा संदेश देत उपस्थित मान्यवर व स्वयंसेवकांना शुभेच्छा दिल्या. मान्यवरांच्या परवानगीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.