३१ मेपर्यंत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज; उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता
३१ मेपर्यंत विजांच्या कडकडाटासह
पावसाचा अंदाज; उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता
शहरात पारा ४२ अंशांवर; उत्तर महाराष्ट्रात जूनच्या मध्यावर मान्सून धडकणार
धुळे लेवाजगत न्यूज प्रतिनिधी-
धुळे शहरातील कमाल तापमानात केवळ एक अंशाने घट झाली असून बुधवारी ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तापमानात फारशी घट नसली तरी अरबी समुद्राकडून येणाऱ्या ओलसर वाऱ्यांमुळे वातावरणातील दमटपणा आणि उकाडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागत असला, तरी आगामी काही दिवसांत पावसामुळे दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
हवामान अभ्यासकांच्या माहितीनुसार, ३१ मेपर्यंत धुळे शहरासह जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
सध्या हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने ‘हिट इंडेक्स’मध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे शरीराची नैसर्गिक थंड होण्याची प्रक्रिया मंदावत असून ४२ अंश तापमान प्रत्यक्षात ४५ ते ४७ अंशांप्रमाणे जाणवत आहे. परिणामी नागरिक ‘ह्युमिडिटी स्ट्रेस’मुळे त्रस्त झाले आहेत.
जिल्ह्यात जाणवत असलेली तीव्र उष्णता, दमट वातावरण आणि ढगांची दाटी ही आगामी मान्सूनच्या आगमनाची प्राथमिक चिन्हे मानली जात आहेत. हवामानातील हा बदल मान्सूनपूर्व स्थिती दर्शवत असून जूनच्या मध्यापर्यंत उत्तर महाराष्ट्रात मुख्य मान्सून प्रणाली दाखल होण्याची दाट शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत