रावेर ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस सेंटरचे ऑनलाईन लोकार्पण; रुग्णांना मोठा दिलासा
रावेर ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस सेंटरचे ऑनलाईन लोकार्पण; रुग्णांना मोठा दिलासा
लेवाजगत न्यूज रावेर प्रतिनिधी :
रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात महाराष्ट्र दिनानिमित्त नव्याने सुरू करण्यात आलेल्या डायलिसिस सेंटरचे ऑनलाईन उद्घाटन राज्याचे आरोग्य मंत्री ना. प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते पार पडले. आमदार अमोल जावळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे सेंटर मंजूर होऊन प्रत्यक्षात साकार झाले आहे.
रावेर शहर व परिसरातील रुग्णांना यापूर्वी डायलिसिससाठी जळगाव किंवा बुऱ्हानपूर येथे जावे लागत होते. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना वेळ आणि आर्थिक खर्चाचा मोठा भार सहन करावा लागत होता. ही अडचण लक्षात घेऊन आमदार अमोल जावळे यांनी ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस सेंटर सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने आता स्थानिक स्तरावरच रुग्णांना उपचाराची सुविधा उपलब्ध झाली असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
ऑनलाईन लोकार्पणानंतर स्थानिक पातळीवरही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगराध्यक्षा संगीता महाजन, नगरसेवक राजेश शिंदे, सीमा जमादार, प्रमिला पाटील, योगिता महाजन, अर्चना पाटील, अमोल पाटील, पद्माकर महाजन, दिलीप पाटील यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश धनके उपस्थित होते. तसेच प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी दीपा जेधे, नायब तहसीलदार संजय तायडे, गटविकास अधिकारी विनोद मेढे, अमित खरात आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमात पद्माकर महाजन यांनी मनोगत व्यक्त करत रावेरकरांच्या वतीने आमदार अमोल जावळे यांचे आभार मानले.
कार्यक्रमास अंबिका व्यायाम शाळेचे भास्कर महाजन, वासु नरवाडे, अरुण शिंदे, सी. एस. पाटील, रवी पाटील, अॅड. सूर्यकांत देशमुख, राहुल पाटील, वाय. व्ही. पाटील, संदीप सावळे, पी. के. महाजन, पवन चौधरी, जगदीश घेटे, पंकज वाघ, चंद्रकांत वैदकर यांच्यासह भारतीय जनता पक्ष व शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन दीपक नगरे यांनी केले, तर प्रास्ताविक व आभार वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव गिरी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. स्वप्नील सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव गिरी, वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश मुकुंद, शारदा धुंदळे तसेच डायलिसिस सेंटरचे कर्मचारी तेजस गाढे, सुलेमान शाह, प्रकाश तायडे आणि इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
या डायलिसिस सेंटरमध्ये एकावेळी पाच रुग्णांवर उपचार करण्याची सुविधा उपलब्ध असून, नागरिकांनी या शासकीय सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन दीपा जेधे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत