Contact Banner

विठ्ठल भेटीसाठी ‘संत मुक्ताई’ पालखीचे २४ जूनला प्रस्थान ३१८ व्या आषाढी वारी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर; २९ दिवसांच्या ‘तापीतीर ते भीमातीर’ अध्यात्मिक प्रवासाला सुरुवात

 

viththal-bhetisathi-sant-muktai-palkhi-prasthan-24-june-2026

विठ्ठल भेटीसाठी ‘संत मुक्ताई’ पालखीचे २४ जूनला प्रस्थान

३१८ व्या आषाढी वारी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर; २९ दिवसांच्या ‘तापीतीर ते भीमातीर’ अध्यात्मिक प्रवासाला सुरुवात

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक मानला जाणारा श्री संत मुक्ताई संस्थान, श्री क्षेत्र मुक्ताईनगर ते श्री क्षेत्र पंढरपूर या ३१८ व्या आषाढी वारी पालखी सोहळ्याची अधिकृत रूपरेषा जाहीर करण्यात आली आहे. "ज्ञानोबा तुकाराम" आणि "आदिशक्ती मुक्ताबाई" यांच्या जयघोषात हा भव्य पालखी सोहळा बुधवार, दि. २४ जून २०२६ रोजी दुपारी १ वाजता श्री संत मुक्ताई समाधी स्थळ पुरातन मंदिर, श्रीक्षेत्र कोथळी (ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.


‘तापीतीर ते भीमातीर’ असा २९ दिवसांचा हा अध्यात्मिक प्रवास यंदा ३१८ व्या वर्षात पदार्पण करत असून, ह.भ.प. रवींद्र महाराज हरणे (पालखी सोहळा प्रमुख) आणि संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष अॅड. रवींद्र प्रल्हादराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोहळा पार पडणार आहे. पालखी सोहळ्याचा प्रारंभ २४ जून रोजी जुने मंदिर येथून होणार असून, घोडसगाव येथे दुपारचा विसावा तर दसरखेड येथे पहिला रात्रीचा मुक्काम असेल. त्यानंतर पालखी मलकापूर, मोताळा, बुलढाणा, येळगाव, चिखली, देऊळगाव मही, जालना, वडीगोद्री, गेवराई, पाडळसिंगी, बीड, पाली, चौसाळा, भुम, वाकडी, माढा, मोडनिंब (आष्टी) आणि रोपडे मार्गे पंढरपूरकडे मार्गस्थ होईल.




बुधवार, दि. २२ जुलै २०२६ रोजी आषाढ शुद्ध नवमीला पालखी सोहळा श्री क्षेत्र पंढरपूर येथील संत मुक्ताई मठ, दत्त घाट येथे दाखल होणार आहे. आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा आणि विठ्ठल-रुक्मिणी दर्शनानंतर बुधवार, दि. २९ जुलै २०२६ रोजी पालखी परतीच्या प्रवासाला सुरुवात करेल. रोपडे, वाकडी फाटा, वांगी, रेंढळगाव, बीड शहजहानपूर, खाजगाव, डावरगाव, काजळा फाटा, आळंद फाटा, चिखली आणि मलकापूर मार्गे प्रवास करत मंगळवार, दि. १८ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी पालखीचे मुक्ताईनगर येथील जुने मंदिरात आगमन होईल.

यानंतर नवीन मंदिर ते मूळ मंदिर असा शहरातून शेकडो दिंड्यांसह भव्य मिरवणूक सोहळा पार पडणार असून, ह.भ.प. रवींद्र महाराज हरणे यांच्या कीर्तनाने सोहळ्याची सांगता होणार आहे. या ऐतिहासिक पालखी सोहळ्यात संत मुक्ताई फडावरील अनेक नामांकित कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार, सेवेकरी, टाळकरी आणि भजनी मंडळ सहभागी होणार आहेत.

पालखी सोहळ्यात शिस्त आणि नियोजन राखण्यासाठी संस्थानतर्फे काही नियमही जाहीर करण्यात आले आहेत. दिंडीत सहभागी होणाऱ्या पताकाधारी व टाळकरी भाविकांनी प्रत्येकी ५०० रुपयांची देणगी पावती घेऊन नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच वारकऱ्यांनी मौल्यवान वस्तू, दागिने किंवा अतिरिक्त सामान सोबत आणू नये. सोहळ्यासोबत चालताना सतत भजन करीत शिस्त पाळावी, असे आवाहन संस्थानतर्फे करण्यात आले आहे.

प्रस्थान सोहळ्यासाठी २४ जून रोजी सकाळी १० वाजेपर्यंत सर्व भाविकांनी जुने मंदिर येथे उपस्थित राहावे, असे आवाहन संत मुक्ताई संस्थानने केले आहे. विठ्ठल भेटीच्या या पवित्र आणि ऐतिहासिक वारी सोहळ्यात मोठ्या संख्येने वारकरी सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.