दोन वर्षांच्या चिमुरडीमुळे उलगडलं कश्यपी धरणातील भीषण सत्य; चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू “पप्पा-मम्मी” म्हणत पाण्याकडे दाखवत होती बोट; बेवारस चपलांमुळे लागला संशय
दोन वर्षांच्या चिमुरडीमुळे उलगडलं कश्यपी धरणातील भीषण सत्य; चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू
“पप्पा-मम्मी” म्हणत पाण्याकडे दाखवत होती बोट; बेवारस चपलांमुळे लागला संशय
लेवाजगत न्यूज नाशिक प्रतिनिधी :-नाशिकजवळील कश्यपी धरण परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील चौघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी सायंकाळी घडली. दोन वर्षांच्या चिमुरडीच्या निरागस हालचालींमुळे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.
माहितीनुसार, शाळांना सुट्ट्या लागल्याने कश्यपी धरण परिसरात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. मंगळवारी सायंकाळी काही नागरिक धरण परिसरात उभे असताना त्यांना एक दोन वर्षांची मुलगी वारंवार पाण्याकडे जात असल्याचे दिसले. धरणाजवळ उभ्या असलेल्या संगीता घाडगे यांनी तात्काळ धाव घेत त्या चिमुरडीला उचलले. मात्र ती मुलगी रडत “पप्पा-मम्मी” असे म्हणत पाण्याकडे बोट दाखवत होती.
या प्रकारामुळे घाडगे यांना संशय आला. त्यांनी परिसरात पाहणी केली असता एका ठिकाणी बेवारस चपला दिसून आल्या. त्यांनी तात्काळ परिसरातील नागरिकांना माहिती दिली. त्याचवेळी जवळील खाड्याच्या वाडी येथे कुस्ती स्पर्धा सुरू असल्याने अनेक तरुण घटनास्थळी पोहोचले.
काही युवकांनी क्षणाचाही विलंब न लावता धरणात उड्या मारून शोधकार्य सुरू केले. काही वेळाने सचिन ठोंबरे (३२), त्यांची पत्नी रोहिणी ठोंबरे, केतन अनिल पवार (१६) आणि कौशल्य अनिल पवार (१४) यांना पाण्याबाहेर काढण्यात आले. मात्र, चौघांचाही मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
प्राथमिक माहितीनुसार, सचिन ठोंबरे हे मूळ संगमनेर तालुक्यातील रहिवासी असून काही वर्षांपासून मुखमलाबाद परिसरातील मानकर मळा येथे वास्तव्यास होते. सुट्टीचा आनंद घेण्यासाठी ते कुटुंबीयांसह कश्यपी धरण परिसरात आले होते. उकाड्यामुळे पाण्यात उतरल्यानंतर धरणाच्या खोलीचा अंदाज न आल्याने एक जण बुडू लागला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात इतर तिघेही पाण्यात गेले आणि ही दुर्दैवी घटना घडली.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे नाशिक परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत