Contact Banner

जळगावात महापौरांची अचानक 'प्लास्टिकविरोधी' मोहीम; अनेक दुकानांना दंड..!

 

jalgaon-mayor-launches-sudden-anti-plastic-drive-fines-imposed-on-shops

जळगावात महापौरांची अचानक 'प्लास्टिकविरोधी' मोहीम; अनेक दुकानांना दंड..!

सराईत विक्रेत्यांना दुकान सील करण्याचा इशारा

लेवाजगत न्यूज जळगाव :
जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर यांनी प्लास्टिक बंदीबाबत यापूर्वीच कठोर निर्देश दिले होते. सुरुवातीला प्लास्टिक विक्रेत्यांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला होता; मात्र गेल्या काही दिवसांपासून शहरात पुन्हा सर्रास प्लास्टिकचा वापर सुरू झाल्याच्या तक्रारी नागरिकांकडून महापौरांकडे येत होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत महापौर दीपमाला काळे यांनी जळगावच्या मध्यवर्ती बाजारपेठेत अचानक धडक तपासणी मोहीम राबवली. या कारवाईमुळे संपूर्ण बाजारपेठेत मोठी खळबळ उडाली.

मुख्य बाजारपेठेत महापौरांची पायी गस्त; विक्रेत्यांची पळापळ

महापौर दीपमाला काळे यांनी स्वतः शहरातील राजकमल टॉकीज परिसर, तिजोरी गल्ली, अशोक टॉकीज गल्ली, दाणा बाजार, नेताजी सुभाषचंद्र चौक आणि फुले मार्केट परिसर या गजबजलेल्या भागांमध्ये पायी फिरून प्लास्टिक पिशव्यांची पाहणी केली. महापौर अचानक तपासणीसाठी आल्याचे पाहताच फळ विक्रेते, भाजी विक्रेते, छोटे-मोठे दुकानदार आणि हॉकर्स यांची एकच पळापळ उडाली. अनेकांनी आपल्याकडील प्लास्टिक पिशव्यांचे साठे तात्काळ लपवण्याचा प्रयत्न केला.

“ग्राहकांना वस्तू कशात पॅक करून देता?” महापौरांचा संतप्त सवाल

तपासणीदरम्यान अनेक दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित प्लास्टिक आढळून आले. महापालिकेच्या आरोग्य विभागाने हे प्लास्टिक जागेवरच जप्त केले, तर नियम मोडणाऱ्या काही दुकानांना मोठा दंड ठोठावण्यात आला. कारवाईदरम्यान महापौरांनी विक्रेत्यांना “तुम्ही फळे आणि इतर वस्तू कशामध्ये पॅक करून ग्राहकांना देता?” असा जाब विचारला. नियमबाह्य प्लास्टिक वापरणाऱ्या विक्रेत्यांकडे यावेळी उत्तर नव्हते.

“पुढच्यावेळी दुकान थेट सील”; महापौरांचा कडक इशारा

काही दुकानांवर यापूर्वी दोन वेळा कारवाई झाली असून आज त्यांना तिसऱ्यांदा दंड ठोठावण्यात आला. अशा सराईत विक्रेत्यांना महापौरांनी कडक शब्दांत सुनावले. यावेळी जवाहर क्लोथ स्टोअर्स आणि एच. आर. ट्रेडर्स यांना प्रत्येकी १० हजार रुपये असा एकूण २० हजारांचा दंड करण्यात आला.

“यापुढे जर तुमच्या दुकानात किंवा हातगाड्यावर प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या आढळल्या, तर महापालिकेतर्फे तुमचे दुकान थेट सील केले जाईल.”
— दीपमाला काळे, महापौर, जळगाव

इको-फ्रेंडली पिशव्या वापरणाऱ्यांचे कौतुक

या धडक मोहिमेदरम्यान काही जागरूक व्यापाऱ्यांकडे पर्यावरणपूरक ‘इको-फ्रेंडली’ बायोडिग्रेडेबल थैल्या आणि शासनमान्य जाड प्लास्टिक पिशव्या आढळून आल्या. नियम पाळणाऱ्या व्यापाऱ्यांचे महापौरांनी कौतुक केले आणि इतर दुकानदारांनीही त्यांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन केले.

नागरिकांनी देखील घरातून बाहेर पडताना कापडी पिशव्या सोबत बाळगाव्यात, असे आवाहन यावेळी महापौरांनी केले. या कारवाईत नगरसेवक , मुख्य स्वच्छता निरीक्षक , , आणि उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.