Contact Banner

पर्यावरण संरक्षणासाठी मोठे पाऊल; ‘झिरो डिस्चार्ज’ एसटीपी प्रकल्प कार्यान्वित सांडपाणी शुद्धीकरण आणि पाण्याच्या पुनर्वापरासाठी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचा पुढाकार

 

zero-discharge-stp-project-operational-for-environment-protection-dr-ulhas-patil-medical-college

पर्यावरण संरक्षणासाठी मोठे पाऊल; ‘झिरो डिस्चार्ज’ एसटीपी प्रकल्प कार्यान्वित

सांडपाणी शुद्धीकरण आणि पाण्याच्या पुनर्वापरासाठी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचा पुढाकार

लेवाजगत न्यूज | जळगाव-वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण आणि पाण्याची वाढती टंचाई लक्षात घेता सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प (एसटीपी) आणि ‘झिरो लिक्विड डिस्चार्ज’ (झेडएलडी) तंत्रज्ञानाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे आधुनिक ‘झिरो डिस्चार्ज’ सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे.


zero-discharge-stp-project-operational-for-environment-protection-dr-ulhas-patil-medical-college


या प्रकल्पाच्या माध्यमातून सांडपाण्याचे शुद्धीकरण करून त्याचा पुनर्वापर करण्यात येत असून पर्यावरण संरक्षणासोबतच पाणी बचतीलाही मोठी मदत होत आहे. एसटीपी म्हणजे घरगुती, हॉस्पिटल, हॉटेल तसेच औद्योगिक सांडपाणी शुद्ध करून ते पुन्हा वापरण्यायोग्य बनवण्याची प्रक्रिया होय.

या प्रक्रियेमध्ये स्क्रीनिंग, सेडीमेंटेशन, बायोलॉजिकल ट्रीटमेंट, एरेशन, क्लॅरिफिकेशन आणि डिसइन्फेक्शन अशा विविध टप्प्यांचा समावेश असतो. या माध्यमातून पाण्यातील घनकचरा, सेंद्रिय घटक आणि जंतू दूर करून स्वच्छ पाणी तयार केले जाते.

तज्ज्ञांच्या मते, एसटीपीमुळे सांडपाण्यामुळे होणारे प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी होते. तसेच शुद्ध केलेले पाणी बागकाम, फ्लशिंग, कूलिंग आणि इतर उपयोगांसाठी पुन्हा वापरता येते. त्यामुळे पाण्याचा खर्च कमी होऊन पर्यावरण संरक्षणालाही मोठा हातभार लागतो. सध्या हाउसिंग सोसायटी, हॉस्पिटल, हॉटेल, उद्योग आणि मॉलमध्ये एसटीपीचा वापर वाढताना दिसत आहे.

याचबरोबर ‘झिरो लिक्विड डिस्चार्ज’ (झेडएलडी) ही आधुनिक प्रणाली विशेष चर्चेत आहे. या तंत्रज्ञानामध्ये सांडपाण्याचा एकही थेंब बाहेर सोडला जात नाही. संपूर्ण पाणी शुद्ध करून त्याचा पुनर्वापर केला जातो. झेडएलडी प्रक्रियेत प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक शुद्धीकरणानंतर रिव्हर्स ऑस्मोसिस (आरओ) आणि इव्हॅपोरेशन प्रक्रियेद्वारे उरलेले द्रव्य पूर्णपणे वेगळे केले जाते.

या तंत्रज्ञानामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होते तसेच प्रदूषणावर संपूर्ण नियंत्रण मिळवता येते. विशेषतः केमिकल, फार्मा आणि टेक्सटाईल उद्योगांमध्ये झेडएलडी प्रणालीचा वापर वाढत आहे. मात्र या प्रकल्पासाठी मोठा खर्च, नियमित देखभाल आणि तांत्रिक कौशल्य आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

एकंदरीत, एसटीपी आणि झेडएलडी या तंत्रज्ञानामुळे पाण्याचे संवर्धन, प्रदूषण नियंत्रण आणि शाश्वत विकास साध्य होण्यास मोठी मदत होत आहे. भविष्यातील पाण्याच्या संकटावर मात करण्यासाठी या प्रणालींचा व्यापक वापर गरजेचा असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

‘झिरो डिस्चार्ज’ एसटीपी प्रकल्पासाठी कार्य करणारी तज्ज्ञांची टीम

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील ‘झिरो डिस्चार्ज’ सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यासाठी संजय भिरूड, उमाकांत भिरूड, परेश पाटील, हितेंद्र चौधरी, नरेंद्र भिरूड, पराग राणे, नोमेश कुरकुरे, रितेश बोंडे, श्रीराम बारेला, घनश्याम पाचपांडे, निखिल पाटील, विशाल भोसांडे, रुपेश भदाणे, हर्षल वाघ, शैलेंद्र फालक, भावेश सोनवणे आणि उमेश धायडे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

या सर्वांच्या तांत्रिक कौशल्य, नियोजन आणि समन्वयामुळे ‘झिरो डिस्चार्ज’ एसटीपी प्रकल्प यशस्वीपणे कार्यान्वित झाला असून पर्यावरण संरक्षण आणि पाणी बचतीच्या दिशेने संस्थेने आदर्श निर्माण केला आहे।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.