Contact Banner

इलेक्ट्रिक वाहन, रोबोटिक्स आणि उत्पादन क्षेत्राचे हृदय - यांत्रिकी अभियांत्रिकी; 12 वी नंतरची स्मार्ट निवड

 

12-vi-nantar-mechanical-engineering-smart-career-choice-bhusawal

इलेक्ट्रिक वाहन, रोबोटिक्स आणि उत्पादन क्षेत्राचे हृदय - यांत्रिकी अभियांत्रिकी; 12 वी नंतरची स्मार्ट निवड

भुसावळ (लेवाजगत न्यूज प्रतिनिधी) : बारावी विज्ञान शाखेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर आणि पालकांसमोर करिअरच्या विविध पर्यायांची निवड करण्याचे आव्हान उभे राहते. अभियांत्रिकी क्षेत्रात संगणक, कृत्रिम बुद्धिमत्ता, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल, इलेक्ट्रिकल अशा अनेक शाखा उपलब्ध असल्या तरी उद्योगविश्वाचा कणा मानली जाणारी यांत्रिकी अभियांत्रिकी (Mechanical Engineering) आजही तितकीच महत्त्वाची आणि भविष्याभिमुख शाखा असल्याचे मत श्री संत गाडगे बाबा अभियांत्रिकी महाविद्यालय, भुसावळ येथील यांत्रिकी विभागाचे प्रा. डॉ. श्रीकांत उल्हास चौधरी यांनी व्यक्त केले आहे.






प्रा. चौधरी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या लेखात म्हटले आहे की, यांत्रिकी अभियांत्रिकीला “अभियांत्रिकीची जननी” म्हणून ओळखले जाते. कोणतेही यंत्र, वाहन, ऊर्जा प्रकल्प, उत्पादन प्रणाली किंवा औद्योगिक प्रक्रिया विकसित करण्यासाठी यांत्रिकी अभियांत्रिकीचे मूलभूत ज्ञान आवश्यक असते. भारतात उत्पादन क्षेत्र, वाहन उद्योग, संरक्षण उत्पादन, अवकाश संशोधन, हरित ऊर्जा, रेल्वे आधुनिकीकरण आणि स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंगमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत असून या सर्व क्षेत्रांच्या केंद्रस्थानी यांत्रिकी अभियंते कार्यरत आहेत.

आज कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), मशीन लर्निंग, रोबोटिक्स आणि ऑटोमेशनचा वापर झपाट्याने वाढत असला तरी या तंत्रज्ञानांच्या डिझाइन, उत्पादन आणि अंमलबजावणीसाठी यांत्रिकी अभियंत्यांची गरज कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विशेषतः स्मार्ट रोबोट्स, स्वयंचलित उत्पादन प्रणाली, इलेक्ट्रिक वाहने आणि औद्योगिक ऑटोमेशनमध्ये या शाखेतील विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.

भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहन क्रांती वेग घेत असून बॅटरी पॅक डिझाइन, थर्मल व्यवस्थापन, चेसिस डिझाइन, उत्पादन नियोजन आणि गुणवत्ता नियंत्रण यांसारख्या क्षेत्रांमध्ये यांत्रिकी अभियंत्यांना मोठी मागणी आहे. तसेच रोबोटिक्स, संरक्षण, अवकाश संशोधन, हरित ऊर्जा, सौर व पवन ऊर्जा प्रकल्प, हरित हायड्रोजन आणि शाश्वत विकास क्षेत्रातही करिअरच्या व्यापक संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.

यांत्रिकी अभियांत्रिकी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना वाहन उद्योग, उत्पादन उद्योग, ऊर्जा क्षेत्र, रेल्वे, विमान व अवकाश उद्योग, संरक्षण उत्पादन, संशोधन व विकास, प्रकल्प व्यवस्थापन तसेच उद्योजकता क्षेत्रात करिअर घडविता येते. याशिवाय स्पर्धा परीक्षा, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि उच्च शिक्षणाचे विविध पर्यायही खुले होतात.

बारावीनंतर शाखा निवडताना विद्यार्थ्यांनी केवळ ट्रेंडचा विचार न करता स्वतःची आवड, क्षमता आणि भविष्यातील उद्दिष्टे लक्षात घेऊन निर्णय घ्यावा, असे आवाहन प्रा. चौधरी यांनी केले आहे. गणित व विज्ञानाची आवड, विश्लेषणात्मक विचारशक्ती, तांत्रिक जिज्ञासा, समस्या सोडविण्याची क्षमता आणि सर्जनशीलता हे गुण यांत्रिकी अभियांत्रिकीमध्ये यशस्वी होण्यासाठी उपयुक्त ठरतात, असेही त्यांनी सांगितले.

यांत्रिकी अभियांत्रिकी ही केवळ मशीन आणि उत्पादन क्षेत्रापुरती मर्यादित नसून नवोन्मेष, संशोधन, ऊर्जा, पर्यावरण, रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि राष्ट्रीय विकासाशी निगडित व्यापक क्षेत्र आहे. त्यामुळे दीर्घकालीन, स्थिर आणि प्रतिष्ठित करिअर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही शाखा एक उत्कृष्ट पर्याय ठरू शकते, असा विश्वास प्रा. डॉ. श्रीकांत उल्हास चौधरी यांनी व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.