Contact Banner

१२ वी नंतर यांत्रिकी अभियांत्रिकीची निवड ठरू शकते उज्ज्वल करिअरची गुरुकिल्ली – डॉ. तुषार कोळी


 १२ वी नंतर यांत्रिकी अभियांत्रिकीची निवड ठरू शकते उज्ज्वल करिअरची गुरुकिल्ली – डॉ. तुषार कोळी


लेवाजगत न्युज जळगाव : १२ वी विज्ञान शाखेनंतर विद्यार्थ्यांसमोर करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध असतात. मात्र, अभियांत्रिकी क्षेत्रातील सर्वात मूलभूत, विश्वासार्ह आणि भविष्याभिमुख शाखा म्हणून यांत्रिकी अभियांत्रिकी (Mechanical Engineering) आजही विद्यार्थ्यांची पहिली पसंती ठरत असल्याचे मत गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जळगाव येथील यांत्रिकी अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. तुषार कोळी यांनी व्यक्त केले.


डॉ. कोळी यांनी सांगितले की, यांत्रिकी अभियांत्रिकीला “इंजिनिअरिंगची जननी” म्हणून ओळखले जाते. वाहन उद्योग, उत्पादन क्षेत्र, ऊर्जा निर्मिती, औद्योगिक यंत्रणा, रोबोटिक्स, ऑटोमेशन, एरोस्पेस तसेच संरक्षण क्षेत्रातील प्रत्येक महत्त्वाच्या तांत्रिक प्रक्रियेमध्ये यांत्रिकी अभियंत्यांचे योगदान असते. त्यामुळे या शाखेचे महत्त्व काळानुरूप अधिक वाढत आहे.




आज कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), इंडस्ट्री 4.0, रोबोटिक्स, इलेक्ट्रिक वाहने (EV), 3D प्रिंटिंग आणि स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासामध्ये यांत्रिकी अभियंत्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे देश-विदेशातील उद्योगांमध्ये या क्षेत्रातील तज्ज्ञांची मागणी सातत्याने वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.


यांत्रिकी अभियांत्रिकीमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी १२ वीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित हे विषय घेतलेले असणे आवश्यक आहे. एमएचटी-सीईटी आणि जेईई मेन या परीक्षांद्वारे बी.ई. किंवा बी.टेक. अभ्यासक्रमात प्रवेश मिळतो. चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमात डिझाईन इंजिनिअरिंग, थर्मोडायनॅमिक्स, CAD/CAM, रोबोटिक्स, मेकॅट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल अभियांत्रिकी आणि औद्योगिक ऑटोमेशन यांसारख्या विषयांचे सखोल शिक्षण दिले जाते.


पदवी पूर्ण केल्यानंतर भारतीय रेल्वे, DRDO, ISRO, BHEL, ONGC, NTPC, HAL यांसारख्या सरकारी संस्थांमध्ये तसेच MPSC, UPSC आणि विविध सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये करिअरच्या उत्तम संधी उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज ऑटो, अशोक लेलँड, L&T, सीमेन्स, बॉश यांसारख्या नामांकित कंपन्यांमध्येही यांत्रिकी अभियंत्यांची मोठी मागणी आहे.


इलेक्ट्रिक वाहन उद्योग, रोबोटिक्स, एरोस्पेस, संरक्षण, हरित ऊर्जा, सौर व पवन ऊर्जा प्रकल्प, हायड्रोजन ऊर्जा आणि डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग यांसारख्या क्षेत्रांमध्ये भविष्यात रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याचे डॉ. कोळी यांनी सांगितले. तसेच अमेरिका, जर्मनी, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि जपानसारख्या देशांमध्ये भारतीय यांत्रिकी अभियंत्यांना विशेष प्राधान्य दिले जाते.


“यांत्रिकी अभियांत्रिकी हे केवळ मशीनचे ज्ञान देणारे क्षेत्र नाही, तर समस्या सोडविण्याची क्षमता, संशोधन वृत्ती, नावीन्यपूर्ण विचार आणि नेतृत्वगुण विकसित करणारे व्यापक क्षेत्र आहे. त्यामुळे १२ वी नंतर करिअरची योग्य दिशा शोधणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी यांत्रिकी अभियांत्रिकी हा अत्यंत विश्वासार्ह आणि उज्ज्वल पर्याय आहे,” असे आवाहन डॉ. तुषार कोळी यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.