Contact Banner

नवनियुक्त API संदीप पाटील यांची पहिली मोठी कारवाई; दोन आरोपी ताब्यात


faizpur-police-raid-on-illegal-cattle-meat-sale-two-accused-detained-80-kg-meat-seized


नवनियुक्त API संदीप पाटील यांची पहिली मोठी कारवाई; दोन आरोपी ताब्यात

फैजपूर लेवाजगत न्यूज  प्रतिनिधी : फैजपूर शहरातील इस्लामपुरा व मिल्लतनगर परिसरात अवैधरित्या गोवंश मांस विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर फैजपूर पोलिसांनी बुधवारी पहाटे धडक कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईत सुमारे ८० किलो गोवंश मांसासह वजनकाटे, वजनमापे व कत्तलीसाठी वापरली जाणारी साधने जप्त करण्यात आली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २४ जून रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास फैजपूर पोलीस स्टेशनचे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार इस्लामपुरा येथील सलीम खॉन मुसा खॉन कुरेशी यांच्या घरालगतच्या पत्र्याच्या शेडमध्ये तसेच मिल्लतनगर परिसरातील शेख साजीद शेख रहीम यांच्या घराशेजारील कंपाऊंडमध्ये अवैधरित्या गोवंश प्राण्यांची कत्तल करून मांस विक्री केली जात असल्याची माहिती समोर आली.

माहितीची खातरजमा केल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून तातडीने पथक तयार केले. पोलिसांनी दोन्ही ठिकाणी एकाच वेळी छापेमारी केली. या कारवाईत सुमारे २२ हजार ३०० रुपये किमतीचे सुमारे ८० किलो गोवंश मांस, वजनकाटे, वजनमापे तसेच कत्तलीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले.

या प्रकरणात सलीम खॉन मुसा खॉन कुरेशी (वय ४५, रा. इस्लामपुरा, फैजपूर) आणि शेख साजीद शेख रहीम (वय ४६, रा. मिल्लतनगर, फैजपूर) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलीस कॉन्स्टेबल राहुल काशिनाथ नावकर यांच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, १९७६ अंतर्गत कलम ५(क) व ९(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत व उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील तसेच फैजपूर पोलीस स्टेशनच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.