Contact Banner

अनिल चौधरींची माघार; नंदकिशोर महाजनांचा विजयाचा मार्ग सुकर

 

jalgaon-mlc-election-anil-chaudhary-withdraws-nandkishor-mahajan-victory-path-clear

अनिल चौधरींची माघार; नंदकिशोर महाजनांचा विजयाचा मार्ग सुकर

जळगाव लेवाजगत न्यूज  प्रतिनिधी-

जळगाव विधानपरिषद निवडणुकीत मोठी राजकीय घडामोड घडली असून अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी मतदानापूर्वीच आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून महायुतीचे उमेदवार नंदकिशोर (नंदुभाऊ) महाजन यांच्या विजयाचा मार्ग अधिक सुकर झाल्याचे मानले जात आहे.





या निवडणुकीत सुरुवातीला महायुतीकडून नंदकिशोर महाजन, महाविकास आघाडीकडून शरद तायडे, अपक्ष अनिल चौधरी आणि अपक्ष रेश्मा काळे असे चार उमेदवार मैदानात होते. दरम्यान, शिवसेनेच्या नगरसेविका रेश्मा काळे यांनीही यापूर्वी आपली उमेदवारी मागे घेतल्याने निवडणूक तिरंगी झाली होती.

आज आयोजित पत्रकार परिषदेत अनिल चौधरी यांनी अधिकृतपणे माघारीची घोषणा केली. यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत बोलताना अनिल चौधरी यांनी सांगितले की, आमदार बच्चू कडू तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून महायुतीच्या हितासाठी उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अनिल चौधरी यांच्या माघारीनंतर आता निवडणुकीच्या रिंगणात केवळ महायुतीचे नंदकिशोर महाजन आणि महाविकास आघाडीचे शरद तायडे हे दोनच उमेदवार उरले आहेत. त्यामुळे निवडणुकीची समीकरणे बदलली असून महाजन यांच्या विजयाच्या शक्यता अधिक बळकट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील राजकीय घडामोडींवर आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.