Contact Banner

केळी उत्पादकांच्या विमा दाव्यांतील विसंगती दूर करा; अन्यथा आंदोलन – धनंजय चौधरी

 

banana-farmers-crop-insurance-discrepancies-remove-injustice-or-face-agitation-dhananjay-chaudhary

केळी उत्पादकांच्या विमा दाव्यांतील विसंगती दूर करा; अन्यथा आंदोलन – धनंजय चौधरी

लेवाजगत न्यूज | सावदा-

जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या पीक विमा दाव्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर विसंगती आढळत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धनंजय शिरीष चौधरी यांनी केला आहे. विमा कंपनीकडून लागवड क्षेत्र, नुकसानग्रस्त क्षेत्र आणि मंजूर दावे यामध्ये तफावत दाखवली जात असल्याने हजारो शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

banana-farmers-crop-insurance-discrepancies-remove-injustice-or-face-agitation-dhananjay-chaudhary


चौधरी यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, पीक विमा दाव्यांच्या पडताळणीसाठी उपग्रह (सॅटेलाईट) तंत्रज्ञानाचा वापर केला जात असला तरी अनेक ठिकाणी प्रत्यक्षात केळीची लागवड असतानाही उपग्रह नोंदींमध्ये ते क्षेत्र लागवडीखाली नसल्याचे दाखवले जात आहे. परिणामी अनेक पात्र शेतकऱ्यांचे विमा दावे नाकारले जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.

जळगाव जिल्हा हा देशातील प्रमुख केळी उत्पादक पट्ट्यांपैकी एक असून हजारो शेतकऱ्यांचे अर्थकारण या पिकावर अवलंबून आहे. वादळ, अवकाळी पाऊस, वाढलेला उत्पादन खर्च, खतांच्या किमती, मजुरी व वीज समस्यांमुळे शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशा वेळी पीक विमा योजनेतच अन्याय होत असल्यास हा शेतकऱ्यांच्या हक्कांवर थेट आघात असल्याचे त्यांनी नमूद केले.

चौधरी यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व संबंधित विभागांनी तातडीने हस्तक्षेप करून विमा कंपनीकडून संपूर्ण माहिती मागवावी, अशी मागणी केली आहे. गावनिहाय, शेतकरीनिहाय व क्षेत्रनिहाय तपशील सार्वजनिक करून प्रत्येक दाव्याची पारदर्शक फेरतपासणी करण्यात यावी. तसेच उपग्रह नोंदी आणि प्रत्यक्ष लागवड क्षेत्रामधील तफावत असलेल्या प्रकरणांची स्वतंत्र चौकशी करून चुकीने नाकारलेले किंवा कमी दाखवलेले दावे तातडीने दुरुस्त करावेत, अशीही मागणी त्यांनी केली.

दरम्यान, १ जून व ४ जून रोजी झालेल्या वादळ आणि चक्रीवादळामुळे जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर विमा दाव्यांमधील विसंगतीमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रश्नासंदर्भात येत्या सोमवारी जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर करण्यात येणार असल्याची माहिती धनंजय चौधरी यांनी दिली. प्रशासनाने तातडीने कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा व्यापक आणि तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.