विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपचे ११ उमेदवार जाहीर; जळगावातून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी
विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपचे ११ उमेदवार जाहीर; जळगावातून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी
लेवाजगत न्यूज जळगांव :-स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या ११ उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्यानंतर रविवारी रात्री उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली.
महायुतीमध्ये १७ जागांचे वाटप करण्यात आले असून त्यापैकी ११ जागांवर भाजप, ४ जागांवर शिवसेना (शिंदे गट) आणि २ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) निवडणूक लढवणार आहे. उमेदवारांची यादी जाहीर होताच काही नावांची राज्यभरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, इतर पक्षांतून भाजपमध्ये दाखल झालेल्या अनेक नेत्यांना पक्षाने संधी दिली आहे.
यामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांचे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सोडून शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या तनपुरे यांना अवघ्या २४ तासांत अहिल्यानगर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
तसेच सोलापूरमधील माजी आमदार राजेंद्र राऊत यांनाही भाजपने उमेदवारी दिली आहे. शिवसेना आणि काँग्रेसमधील राजकीय प्रवासानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. विधानसभा निवडणुकीत त्यांचा अत्यंत कमी मतांच्या फरकाने पराभव झाला होता.
नांदेडमध्ये काँग्रेसचे माजी आमदार अमर राजूरकर यांना भाजपने उमेदवारी दिली असून ते ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जातात. तर धाराशिव-लातूर-बीड या महत्त्वाच्या मतदारसंघातून काँग्रेसचे माजी आमदार बसवराज पाटील यांना भाजपने रिंगणात उतरवले आहे.
दरम्यान, जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपने नंदकिशोर महाजन यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील या निवडणुकीकडे विशेष लक्ष लागले आहे.
भाजपचे विधान परिषद निवडणुकीसाठी जाहीर उमेदवार
- वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली : अरुण लखाणी
- भंडारा-गोंदिया : अविनाश ब्राह्मणकर
- अमरावती : प्रवीण पोटे पाटील
- सांगली-सातारा : धैर्यशील कदम
- सोलापूर : राजेंद्र राऊत
- अहिल्यानगर : प्राजक्त तनपुरे
- छत्रपती संभाजीनगर-जालना : सुहास शिरसाट
- नांदेड : अमर राजूरकर
- धाराशिव-लातूर-बीड : बसवराज पाटील
- जळगाव : नंदकिशोर महाजन
- नागपूर विधान परिषद पोटनिवडणूक- राजीव पोतदार
भाजपने या निवडणुकीत अनुभवी तसेच नव्या चेहऱ्यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला असून महायुतीच्या जागावाटपानंतर आता सर्व मतदारसंघांतील निवडणूक लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. अनेक ठिकाणी अटीतटीच्या लढती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत