मिस्त्री काम करत पूर्ण केले स्वप्न; फैजपूरच्या अझर शेखची मुंबई पोलीस दलात दमदार निवड
मिस्त्री काम करत पूर्ण केले स्वप्न; फैजपूरच्या अझर शेखची मुंबई पोलीस दलात दमदार निवड
फैजपूर, लेवाजगत न्यूज प्रतिनिधी :-
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर फैजपूर येथील युवक अझर शेख याने मुंबई पोलीस दलात निवड होऊन उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्याच्या या यशामुळे संपूर्ण फैजपूर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अझर शेख यांचे बालपण अत्यंत गरिबीत गेले. त्यांचा परिवार एका छोट्याशा १० बाय १२ च्या खोलीत राहत होता. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने वडील बाबू शेख हे ट्रक चालक म्हणून रात्रंदिवस मेहनत करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. घरातील परिस्थितीची जाणीव असल्याने अझरनेही लहान वयातच जबाबदारी स्वीकारली.
शिक्षण घेत असतानाच त्याने मिस्त्री काम करून कुटुंबाला आर्थिक मदत करण्यास सुरुवात केली. दिवसभर कष्टाचे काम आणि रात्री अभ्यास व पोलीस भरतीची तयारी, असा त्याचा संघर्ष अनेक वर्षे सुरू होता. आर्थिक अडचणी, अपुरी साधनसामग्री आणि प्रतिकूल परिस्थिती यांचा सामना करत असतानाही त्याने आपले ध्येय डोळ्यांसमोर ठेवून अथक परिश्रम सुरू ठेवले.
मुंबई पोलीस भरतीच्या अंतिम टप्प्यात अझरने अधिक मेहनत घेतली. नियमित सराव, शारीरिक तयारी आणि अभ्यास यांच्या जोरावर त्याने भरती प्रक्रियेत यश मिळवत अखेर मुंबई पोलीस दलात स्थान मिळवले. या यशामुळे त्याच्या कुटुंबाच्या संघर्षाला यशाची किनार लाभली असून परिसरातील अनेक युवकांसाठी तो प्रेरणास्थान ठरला आहे.
अझर शेख यांच्या यशाने हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, सातत्य, मेहनत आणि आत्मविश्वास यांच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते.
मुंबई पोलीस दलात निवड झाल्याबद्दल अझर शेख यांचे मित्रपरिवार, नातेवाईक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते तसेच फैजपूर व परिसरातील नागरिकांकडून अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
"संघर्षातून घडलेले यशच सर्वात मोठी प्रेरणा असते," याचे जिवंत उदाहरण म्हणजे फैजपूरचा युवा पोलीस शिपाई अझर शेख होय.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत