व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुला मिळाले नवजीवन डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञांच्या अथक प्रयत्नांना यश
व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुला मिळाले नवजीवन
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञांच्या अथक प्रयत्नांना यश
जळगाव (लेवाजगत न्यूज) : अमळनेर येथील अवघ्या तीन महिन्यांच्या एका बालिकेवर यशस्वी उपचार करून तिचे प्राण वाचविण्यात डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञांच्या टीमला यश आले आहे. अत्यंत गंभीर अवस्थेत व्हेंटीलेटरवर दाखल करण्यात आलेल्या या शिशुला दहा दिवसांच्या अथक उपचारांनंतर नवजीवन मिळाले असून सध्या तिची प्रकृती पूर्णपणे धोक्याबाहेर आहे.
अमळनेर येथील मोनीस हारून शेख यांच्या तीन महिन्यांच्या बालिकेला काही दिवसांपासून तीव्र ताप येत होता. त्याचबरोबर तिला वारंवार झटके येऊ लागल्याने कुटुंबीयांनी तातडीने धुळे येथील एका रुग्णालयात दाखल केले. तेथे प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने बालिकेला कृत्रिम श्वसन यंत्रणेवर (व्हेंटीलेटर) ठेवण्यात आले. मात्र अपेक्षित सुधारणा होत नसल्याने आणि अधिक प्रगत उपचारांची गरज भासल्याने तिला जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात हलविण्यात आले.
रुग्णालयात दाखल होताच एनआयसीयू आणि पीआयसीयू विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांनी बालिकेची सखोल तपासणी सुरू केली. यामध्ये पाठीतील पाण्याची तपासणी, मेंदूचा एमआरआय तसेच विविध रक्त तपासण्या करण्यात आल्या. तपासणी अहवालांच्या आधारे बालिकेला ‘एनसेफेलायटीस’ (मेंदूची सूज) हा गंभीर आजार झाल्याचे निदान झाले.
यानंतर बालरोग तज्ज्ञ डॉ. सुयोग तन्नीरवार, डॉ. उमाकांत अणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. ओमश्री गुडे, डॉ. कुशल धांडे, डॉ. विशाल कोठावडे, डॉ. नवेद खान, डॉ. मिमोनी कुंभारे, डॉ. सृष्टी भिरूड, डॉ. अस्मिता गायकवाड, डॉ. निशीगंधा सोनवणे आणि डॉ. भारती झोपे यांच्या टीमने उपचार पद्धतीत आवश्यक बदल करून प्रतिबंधात्मक औषधांचा डोस वाढविला. बालरोग विभाग, अतिदक्षता विभागातील डॉक्टर, परिचारिका आणि तंत्रज्ञ यांनी सातत्याने लक्ष ठेवून उपचार सुरू ठेवले.
उपचारांना सकारात्मक प्रतिसाद मिळत गेल्याने बालिकेची प्रकृती हळूहळू सुधारू लागली. दहा दिवसांच्या उपचारांनंतर तिला व्हेंटीलेटरमधून बाहेर काढण्यात आले आणि अखेर ती पूर्णपणे धोक्याबाहेर आली. या यशस्वी उपचारामुळे बालिकेच्या कुटुंबीयांनी डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासनाचे आभार मानले.
विशेष म्हणजे या बालिकेवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत पूर्णपणे मोफत उपचार करण्यात आले. त्यामुळे कुटुंबीयांवरील आर्थिक भारही टळला. पीआयसीयू विभागातील हिरामण लांडगे यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी विशेष सहकार्य केले.
कोट...
"बालिका आमच्याकडे अत्यंत गंभीर अवस्थेत दाखल झाली होती. तिला ताप, झटके आणि श्वसनाचा त्रास होता. आवश्यक तपासण्यांमधून एनसेफेलायटीसचे निदान झाल्यानंतर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. एनआयसीयू आणि पीआयसीयू विभागातील संपूर्ण टीमच्या समन्वित प्रयत्नांमुळे बालिकेची प्रकृती सुधारली आणि तिला नवजीवन देता आले. लहान मुलांमध्ये तापासोबत झटके किंवा इतर असामान्य लक्षणे दिसल्यास पालकांनी तातडीने तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा."
– डॉ. नवेद खान, बालरोग तज्ज्ञ, डॉ. उल्हास पाटील रुग्णालय


कोणत्याही टिप्पण्या नाहीत