विष प्राशनानंतर दहिगाव येथील शेतकऱ्याचा मृत्यू; कर्जबाजारीपणातून उचलले टोकाचे पाऊल
विष प्राशनानंतर दहिगाव येथील शेतकऱ्याचा मृत्यू; कर्जबाजारीपणातून उचलले टोकाचे पाऊल
दहिगाव, ता. यावल | प्रतिनिधी
दहिगाव येथील अल्पभूधारक तरुण शेतकरी विश्वास उर्फ पिंटू रामकृष्ण चौधरी (वय ४०) यांचा विष प्राशन केल्यानंतर उपचारादरम्यान आठ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर गुरुवार, १८ जून रोजी पहाटे दुर्दैवी मृत्यू झाला. डोक्यावर असलेल्या बँक व खासगी कर्जाच्या ओझ्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.
विश्वास चौधरी हे दहिगाव येथील रहिवासी असून त्यांच्यावर बँकेचे तसेच खासगी कर्ज होते. गेल्या वर्षी शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळाले नव्हते. यंदाही पावसाअभावी खरीप हंगामाबाबत अनिश्चिततेचे सावट निर्माण झाल्याने ते मानसिक तणावाखाली होते. या नैराश्यातून त्यांनी ११ जून रोजी सकाळी विष प्राशन केले होते.
यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आठ दिवस मृत्यूशी संघर्ष केल्यानंतर १८ जून रोजी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे दहिगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत