गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड
लेवाजगत न्यूज जळगाव : गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक, जळगावच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन (एढउ) विभागातील विद्यार्थ्यांनी कॅम्पस प्लेसमेंटमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. नामांकित तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांची निवड झाल्याने महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
कॅम्पस प्लेसमेंट प्रक्रियेत विजय पाटील आणि दिपाली खोडके यांची सॅमटल एव्हिऑनिक्स या अग्रगण्य कंपनीत निवड झाली आहे. तसेच मोहिनी पाटील, वर्षा चौधरी आणि राज शिंपी यांची व्हीव्हीडीएन टेक्नॉलॉजी या देशातील आघाडीच्या तंत्रज्ञान कंपनीत निवड झाली आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांची मेहनत, सातत्यपूर्ण अभ्यास, तांत्रिक कौशल्ये तसेच महाविद्यालयाकडून दिले जाणारे दर्जेदार शिक्षण आणि प्रशिक्षण यांचा मोठा वाटा असल्याचे महाविद्यालय प्रशासनाने सांगितले. विद्यार्थ्यांना उद्योगजगताच्या गरजेनुसार तयार करण्यासाठी महाविद्यालयात नियमितपणे तांत्रिक कार्यशाळा, व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्रम, मॉक इंटरव्ह्यू आणि कौशल्यविकास उपक्रम आयोजित केले जातात. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी डॉ. विजयकुमार वानखेडे तसेच ई अँड टीसी विभागप्रमुख डॉ. हेमंत इंगळे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना उत्कृष्ट करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी उद्योग क्षेत्राशी सातत्याने संपर्क ठेवला जात असून भविष्यातही अधिकाधिक विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळाली असून परिसरात आनंदाचे वातावरण आहे. पालक, शिक्षक आणि सहविद्यार्थ्यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत