वर्सोव्यात सहाव्या मजल्यावरून पडून जळगावच्या हॉटेल व्यावसायिकाचा मृत्यू; आत्महत्या की घातपात? तपास सुरू
वर्सोव्यात सहाव्या मजल्यावरून पडून जळगावच्या हॉटेल व्यावसायिकाचा मृत्यू; आत्महत्या की घातपात? तपास सुरू
प्रतिनिधी | जळगाव
मुंबईतील वर्सोवा परिसरात एका हॉटेलच्या सहाव्या मजल्यावरून पडल्याने जळगाव येथील हॉटेल व्यावसायिकाचा गुरुवारी सकाळी सुमारे ११ वाजता मृत्यू झाला. पवन सुनील पाटील (मूळ रा. नशिराबाद, सध्या अयोध्यानगर, जळगाव) असे मृताचे नाव असून, त्यांच्या मृत्यूमागे आत्महत्या आहे की घातपात, याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. पोलिसांकडून याप्रकरणी तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पवन पाटील यांचे वडील रेमंड कंपनीत कार्यरत होते. वडिलांच्या निधनानंतर पवन हे आईसोबत जळगाव शहरातील अयोध्यानगर परिसरात राहत होते. गेल्या काही वर्षांपासून ते मुंबईत हॉटेल व्यवसाय करत होते.
गुरुवारी सकाळी वर्सोवा येथील एका हॉटेलच्या सहाव्या मजल्यावरून ते खाली पडल्याची घटना घडली. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच त्यांचे काका तथा जळगावातील हॉटेल गौरवचे संचालक योगेश पाटील हे तातडीने मुंबईकडे रवाना झाले.
पवन पाटील यांच्या पश्चात आई व विवाहित बहीण असा परिवार आहे. दरम्यान, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास करण्यात येत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत