Contact Banner

गोदावरीच्या विविध प्रकल्पांमध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण व जनजागृती उपक्रम

godavari-environment-day-2026-tree-plantation-jalgaon`


गोदावरीच्या विविध प्रकल्पांमध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण व जनजागृती उपक्रम

लेवाजगत न्यूज | जळगाव, दि. ५ जून – जागतिक पर्यावरण दिन २०२६ निमित्त गोदावरी फाउंडेशनच्या विविध शैक्षणिक प्रकल्पांमध्ये वृक्षारोपण, पर्यावरण जनजागृती, प्लास्टिकमुक्त परिसर अभियान आणि मिशन लाईफ उपक्रम उत्साहात राबविण्यात आले. "निसर्गापासून प्रेरित, हवामानासाठी, आपल्या भविष्यासाठी" या संकल्पनेला अनुसरून विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी यांनी पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला.




गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या कम्युनिटी हेल्थ नर्सिंग विभागातर्फे डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. जेसिंथ धाया, विभागप्रमुख प्रा. निर्भय मोहोड, प्रा. मेनाओदेवी खुराईजम, प्रा. कॉलेट लोंढे, प्रा. आश्लेषा मून, प्रा. रितेश पडघान, प्रा. सुमित भारंबे आणि प्रा. डीवायना पवार यांच्यासह नर्सिंगच्या सातव्या सत्रातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. उपस्थितांनी पर्यावरण संरक्षणाची सामूहिक शपथ घेतल्यानंतर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

याच अनुषंगाने गोदावरी नर्सिंग कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) युनिटतर्फे ‘प्लास्टिकमुक्त परिसर’ जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या मोहिमेदरम्यान विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी प्लास्टिकचा वापर कमी करण्याचा आणि स्वच्छ, हरित व निरोगी पर्यावरणासाठी योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला.

दरम्यान, डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, जळगाव येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण आणि मिशन लाईफ उपक्रम उत्साहात पार पडला. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, रुग्णालय कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. स्वच्छता मोहीम, जलसंधारण जनजागृती, कचरा वर्गीकरण, प्लास्टिक वापर कमी करण्याचे उपक्रम तसेच विविध पर्यावरणपूरक कृती राबविण्यात आल्या. पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात पर्यावरणपूरक सवयी अंगीकारणे आवश्यक असल्याचे महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. हर्षल बोरोले यांनी सांगितले.

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी पर्यावरण जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी दीपक प्रमिला चंद्रकांत कदम प्रमुख उपस्थित होते. त्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करून "झाडे लावा, झाडे जगवा" हा संदेश दिला तसेच पर्यावरण संरक्षणाची शपथ घेतली.

तसेच कृषी महाविद्यालयातील बी.एस्सी. अॅग्रीकल्चर अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी मस्कावद खुर्द येथे वृक्षारोपण आणि पर्यावरण जनजागृतीचा स्तुत्य उपक्रम राबविला. "हरित गाव, स्वच्छ गाव, सुंदर गाव – पर्यावरण दिनानिमित्त एक पाऊल निसर्गाच्या दिशेने" या ब्रीदवाक्यानुसार विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांना पर्यावरण रक्षणाचे महत्त्व पटवून दिले. या उपक्रमाला सरपंच अलका पाटील व उपसरपंच प्रकाश तायडे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम अधिकारी प्रा. कार्तिक ए. खारचे यांच्या नियोजनाखाली पार पडलेल्या या उपक्रमात अभिजित सदानशिव, हर्षद जैन, धिरज खेडकर, संकेत अघाव, अरविंद गौड आणि शेख जीशान या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणासह रोपांच्या संवर्धनाची जबाबदारी स्वीकारली.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राबविण्यात आलेल्या या विविध उपक्रमांमधून पर्यावरण संवर्धन, वृक्षसंवर्धन, प्लास्टिकमुक्ती आणि शाश्वत जीवनशैलीचा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचविण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.