गोदावरी हेल्थ सिटी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
गोदावरी हेल्थ सिटी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
लेवाजगत न्यूज जळगाव (प्रतिनिधी): आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त गोदावरी हेल्थ सिटी येथे योगाभ्यास शिबिराचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. या शिबिरात योगगुरू चैतन्य क्षीरसागर तसेच योग शिक्षिका डॉ. कोमल पाटील यांनी योगाचे शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक महत्त्व उपस्थितांना समजावून सांगितले.
यावेळी त्यांनी विविध योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांकडून प्रत्यक्ष सराव करून घेतला. योगाभ्यासामुळे शरीर निरोगी राहण्याबरोबरच मानसिक संतुलन आणि सकारात्मक ऊर्जा वाढते, असे मार्गदर्शन त्यांनी केले.
कार्यक्रमप्रसंगी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांनी योगामुळे व्यक्तीच्या आरोग्याबरोबरच कार्यक्षमता, मानसिक स्थैर्य आणि जीवनशैलीत सकारात्मक बदल घडून येतात, असे सांगितले. नियमित योगाभ्यास हा निरोगी व आनंदी जीवनाचा पाया असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमात गोदावरी फाउंडेशन अंतर्गत कार्यरत सर्व वैद्यकीय सेवांशी संबंधित महाविद्यालयांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमास विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, अध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
योगाभ्यास शिबिरामुळे उपस्थितांमध्ये योगाविषयी जागरूकता निर्माण झाली असून नियमित योग करण्याचा संकल्प यावेळी अनेकांनी व्यक्त केला.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत