Contact Banner

"जळगावात जिल्ह्यात मोठी कारवाई! भेसळीचा संशय शेव, तेल आणि शीतपेयांचा लाखोंचा साठा जप्त" अन्न व औषध प्रशासनाची जिल्हाभर धडक कारवाई


jalgaon-food-adulteration-ratlami-sev-cold-drinks-oil-seized-fda-action


"जळगावात जिल्ह्यात मोठी कारवाई! भेसळीचा संशय शेव, तेल आणि शीतपेयांचा लाखोंचा साठा जप्त"

अन्न व औषध प्रशासनाची जिल्हाभर धडक कारवाई

लेवाजगत न्यूज जळगाव, प्रतिनिधी :
अन्न सुरक्षा मानके कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या अन्न व्यावसायिकांविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाने जिल्ह्यात धडक कारवाई करत भेसळीचा संशय असलेले व मानकांबाह्य अन्नपदार्थ, खाद्यतेल आणि शीतपेयांचा तब्बल २ लाख ३१ हजार रुपयांचा साठा जप्त केला आहे.




एमआयडीसी परिसरातील एका फरसाण उत्पादक पेढीची तपासणी केली असता उत्पादन प्रक्रियेत अस्वच्छता तसेच पुन्हा-पुन्हा वापरलेल्या खाद्यतेलाचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी वापरलेले खाद्यतेल तसेच जाड व बारीक रतलामी शेवचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. उर्वरित १४.९ किलो रतलामी शेवचा ७ हजार ८० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

दरम्यान, एमआयडीसीतील एका शीतपेय विक्रेता व वितरकाची तपासणी करताना ‘ब्लॅक बगीरा’ या कॅफिनयुक्त कार्बोनेटेड शीतपेयामध्ये लेबलिंग संदर्भातील त्रुटी तसेच मानकांचे उल्लंघन झाल्याचा संशय आढळून आला. त्यामुळे त्याचा नमुना तपासणीसाठी घेण्यात आला. तसेच २०० मिली क्षमतेच्या ७ हजार ४४० बाटल्यांचा १ लाख ४४ हजार ८०० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. संबंधित पुरवठादार व उत्पादकांविरोधात कारवाई करण्यात आली असून उत्पादनाचा साठा बाजारातून परत मागवण्याबाबत उत्पादकास नोटीस बजावण्यात आली आहे.

बोदवड रोडवर खुल्या सोयाबीन तेलाची विक्री

मुक्ताईनगर तालुक्यातील बोदवड रोड परिसरात खुल्या स्वरूपात विक्री होत असलेल्या रिफाइन्ड सोयाबीन तेलावरही कारवाई करण्यात आली. अन्न सुरक्षा मानकांनुसार पॅकिंग न करता खाद्यतेलाची विक्री होत असल्याचे आढळल्याने नमुना तपासणीसाठी घेण्यात आला. यावेळी ३५८ किलो खाद्यतेलाचा ५७ हजार २८० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

बांबरूड फाटा येथे लस्सी विक्रेत्यावर धाड

पाचोरा तालुक्यातील बांबरूड फाटा, लोहटार येथील एका उत्पादक पेढीची तपासणी करण्यात आली. येथे उत्पादित लस्सीच्या पॅकेटवर उत्पादन दिनांक व समूह क्रमांक नमूद नसल्याचे आढळून आले. भेसळीचा संशय असल्याने लस्सीचा नमुना विश्लेषणासाठी घेण्यात आला. तसेच २२ हजार ५०० रुपये किमतीची २०० मिली क्षमतेची ७५० लस्सी पॅकेट्स जप्त करण्यात आली.

ही कारवाई अन्न सहायक आयुक्त संतोष कांबळे, सहायक आयुक्त दीनानाथ शिंदे, अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर, किशोर साळुंके, योगराज सूर्यवंशी आणि अमोल जगताप यांच्या पथकाने केली.

नागरिकांना आवाहन

जिल्ह्यात कुठेही भेसळीचे प्रकार आढळल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.