जळगाव विधान परिषद निवडणूक : अनिल चौधरी यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल
जळगाव विधान परिषद निवडणूक : अनिल चौधरी यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल
जळगाव, प्रतिनिधी : जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी भुसावळ येथील अनिल चौधरी यांनी सोमवारी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जिल्हाभरातील नगराध्यक्ष, नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अनिल चौधरी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, हा केवळ उमेदवारी अर्ज नसून अनेक वर्षांपासून जपलेल्या मैत्रीचा, कार्यकर्त्यांच्या विश्वासाचा आणि जनतेने दिलेल्या प्रेमाचा सन्मान आहे. भुसावळपासून ते जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांतील प्रतिनिधींनी दिलेला पाठिंबा आणि उपस्थितीमुळे हा क्षण अधिक भावनिक झाल्याचे त्यांनी नमूद केले.
"राजकारणात पदापेक्षा माणसे मोठी असतात. आज अर्ज दाखल करताना माझ्यासोबत उभे असलेले शेकडो मित्र, सहकारी आणि हितचिंतक पाहून माझी जबाबदारी अधिक वाढली आहे," असे चौधरी यांनी सांगितले.
जिल्ह्यातील विविध भागांतील समर्थकांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या. आगामी निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार असून जनतेने आणि स्थानिक स्वराज्य संस्थांतील प्रतिनिधींनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
"आपल्या सर्वांच्या आशीर्वाद, प्रेम आणि पाठिंब्याच्या बळावर ही निवडणूक लढणार असून, आपण दाखवलेला विश्वास कधीही कमी पडू देणार नाही," अशी ग्वाही अनिल चौधरी यांनी यावेळी दिली.
जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून अनिल चौधरी यांच्या उमेदवारीमुळे राजकीय समीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत