आतड्यांना बसलेला जीवघेणा पीळ; वेळीच शस्त्रक्रियेमुळे ७८ वर्षीय वृद्धाला जीवदान वेळीच निदान व यशस्वी शस्त्रक्रियेमुळे मोठा धोका टळला
आतड्यांना बसलेला जीवघेणा पीळ; वेळीच शस्त्रक्रियेमुळे ७८ वर्षीय वृद्धाला जीवदान
वेळीच निदान व यशस्वी शस्त्रक्रियेमुळे मोठा धोका टळला
लेवाजगत न्यूज जळगाव : तीव्र पोटदुखी, पोट फुगणे आणि अनेक दिवस शौचास न होणे अशा गंभीर लक्षणांमुळे रुग्णालयात दाखल झालेल्या ७८ वर्षीय वृद्धाचे प्राण डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या तत्परतेमुळे वाचले. मोठ्या आतड्याला बसलेला धोकादायक पीळ (सिग्मॉइड व्हाल्वुलस) वेळीच ओळखून यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याने रुग्णाला नवजीवन मिळाले.
मलकापूर येथील लक्ष्मण पाटील (वय ७८) यांना काही दिवसांपासून तीव्र पोटदुखीचा त्रास होत होता. कालांतराने त्यांचे पोट मोठ्या प्रमाणात फुगले आणि शौचास होणे पूर्णपणे बंद झाले. प्रकृती अधिक गंभीर होत असल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले.
शल्यचिकित्सक डॉ. चैतन्य पाटील यांनी रुग्णाच्या लक्षणांचा सखोल अभ्यास करून तातडीने सीटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला. तपासणीत मोठ्या आतड्याच्या सिग्मॉइड भागाला पीळ बसल्याचे स्पष्ट झाले. वैद्यकीय भाषेत या गंभीर अवस्थेला 'सिग्मॉइड व्हाल्वुलस' असे म्हटले जाते.
या अवस्थेत आतडे स्वतःभोवती वळल्याने अन्न, वायू आणि मल यांचा मार्ग पूर्णपणे बंद होतो. उपचारास विलंब झाल्यास आतड्याचा रक्तपुरवठा थांबून आतडे निकामी होण्याची तसेच रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते.
निदान होताच डॉ. चैतन्य पाटील, डॉ. प्रज्योत कदम आणि डॉ. आदित्य पाटील यांच्या शल्यचिकित्सकांच्या टीमने तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रियेदरम्यान आतड्याला बसलेला पीळ यशस्वीरित्या सोडविण्यात आला आणि आवश्यक वैद्यकीय उपचार करण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती झपाट्याने सुधारली असून सध्या ते धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
प्रतिक्रिया :
"सिग्मॉइड व्हाल्वुलस ही विशेषतः वृद्धांमध्ये आढळणारी गंभीर समस्या आहे. पोटदुखी, पोट फुगणे, उलट्या होणे किंवा शौचास न होणे अशी लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करू नये. वेळेत सीटी स्कॅनसारख्या तपासण्या केल्यास अचूक निदान होते आणि योग्य उपचारांमुळे जीवितहानी टाळता येते. या रुग्णाच्या बाबतीतही वेळीच निदान झाल्यामुळे शस्त्रक्रिया करून त्यांचे प्राण वाचविणे शक्य झाले." — डॉ. प्रज्योत कदम, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालय




कोणत्याही टिप्पण्या नाहीत