मंगरूळजवळ भीषण अपघात; सहा जणांचा मृत्यू, एक बालक उपचाराधीन
मंगरूळजवळ भीषण अपघात; साखरपुड्यासाठी निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, सहा जणांचा मृत्यू
अमळनेर लेवाजगत न्यूज प्रतिनिधी-
अमळनेर-धुळे महामार्गावरील मंगरूळ गावाजवळील हॉटेल वृंदावन परिसरात सोमवारी सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. प्राथमिक माहितीनुसार एसटी बस, बोलेनो कार आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या तिहेरी धडकेत सहा जणांचा मृत्यू झाला असून एक बालकासह दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात राज्यातील व्यारा परिसरातून साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी काही जण बोलेनो कारने अमळनेरकडे येत होते. दरम्यान, मंगरूळजवळ त्यांच्या वाहनाचा मोटारसायकल आणि एसटी बसशी भीषण अपघात झाला. धडकेचा जोर इतका प्रचंड होता की कारचा अक्षरशः चुराडा झाला, तर मोटारसायकलचेही मोठे नुकसान झाले.
या दुर्दैवी घटनेत मोटारसायकलस्वारासह कारमधील पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातातून एक बालक बचावले असून त्याच्यासह आणखी एक जण गंभीर जखमी झाला आहे. दोघांवरही खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थ, पोलीस, आपत्कालीन पथक तसेच एसटी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघातग्रस्त वाहनांमध्ये अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढून रुग्णालयात हलविण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.
गुजरातमधून आनंदाच्या क्षणासाठी निघालेल्या वऱ्हाडावर काळाने घाला घातल्याने दोन्ही राज्यांत हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस पुढील तपास करीत आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत