वादळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची रावेर तालुक्यात पाहणी
वादळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची रावेर तालुक्यात पाहणी
लेवाजगत न्यूज रावेर : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मान्सूनपूर्व पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे केळीसह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी रविवारी रावेर तालुक्यातील विविध गावांना भेट देत नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली.
खिरवड, निरूळ, अहिरवाडी, केऱ्हाळा, विवरा, कुंभारखेडा, सावदा आणि निंबोल या गावांमध्ये जाऊन त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी केळी पिकांचे नुकसान तसेच वादळी वाऱ्यामुळे बाधित झालेल्या घरांची पाहणी करण्यात आली. स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि संबंधित नागरिक यावेळी उपस्थित होते.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी पंचनामे तत्काळ पूर्ण करण्याबाबत प्रशासन आणि संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्याचे खडसे यांनी सांगितले. तसेच पिक विमा योजनेंतर्गत लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानीची माहिती संबंधित अधिकारी आणि विमा प्रतिनिधींना वेळेत द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
शासन स्तरावर शेतकऱ्यांना आवश्यक मदत मिळावी यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत