मोठे वाघोदा येथील जिल्हा परिषद शाळा रामभरोसे; संरक्षण भिंत व प्रवेशद्वाराची दुरवस्था
मोठे वाघोदा येथील जिल्हा परिषद शाळा रामभरोसे; संरक्षण भिंत व प्रवेशद्वाराची दुरवस्था
लेवाजगत न्यूज | मोठे वाघोदा प्रतिनिधी
रावेर तालुक्यातील मोठे वाघोदा येथील जिल्हा परिषद मराठी मुला-मुलींच्या शाळेची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून शाळेला संरक्षण भिंत आणि प्रवेशद्वार नसल्याने परिसराचा वापर सर्रास सार्वजनिक रस्त्यासारखा केला जात आहे. तुटलेल्या संरक्षण भिंतीमुळे मोकाट जनावरे शाळेच्या आवारात वावरत असून शालेय साहित्याचे नुकसान होण्याचे प्रकार वाढले आहेत.
प्राथमिक शिक्षण हा विद्यार्थ्यांच्या जडणघडणीतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. जिल्हा परिषद शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण दिले जात असले तरी विद्यार्थ्यांना आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत.
शाळेच्या वर्गखोल्यांच्या छतावर वॉटरप्रूफिंग नसल्यामुळे पावसाळ्यात छत गळते. जागोजागी पडलेल्या भेगांमधून पाणी झिरपत असल्याने शाळेतील इलेक्ट्रॉनिक साहित्य खराब होण्याचा धोका वाढला आहे. तसेच विद्यार्थी आणि शिक्षकांना विजेचा धक्का बसण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षणही प्रभावित होत आहे.
याशिवाय, शाळेतील फरशा पोकळ झाल्यामुळे साप आणि घुशींचा वावर आढळून आला आहे. मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची सुविधा असली तरी संरक्षण भिंत नसल्याने बाहेरील लोक त्यांचा वापर करत असल्याने अस्वच्छतेची समस्या निर्माण झाली आहे.
शाळेला संरक्षण भिंत आणि प्रवेशद्वार नसल्याने गावातील काही युवक शाळा सुटल्यानंतर परिसरात मोटारसायकली चालवतात. तसेच वर्गखोल्या आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.
स्थानिक नागरिकांच्या मते, शाळेला संरक्षक भिंत उभारल्यास परिसर सुरक्षित होईल. तसेच शाळेत परसबाग, वृक्षारोपण, खेळाचे मैदान यांसारखे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक वातावरण तयार करता येईल.
त्यामुळे ग्रामपंचायत, शिक्षण विभाग, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष घालून आवश्यक निधी उपलब्ध करून शाळेच्या दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी पालक व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. शाळेचे अस्तित्व आणि विद्यार्थ्यांचे सुरक्षित भविष्य जपण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत