मुक्ताई पालखी मार्गाला अधिकृत मान्यता व विशेष निधीची मागणी मुक्ताईनगर ते पंढरपूर पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना विशेष अनुदान देण्याचा आग्रह
मुक्ताई पालखी मार्गाला अधिकृत मान्यता व विशेष निधीची मागणी
मुक्ताईनगर ते पंढरपूर पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना विशेष अनुदान देण्याचा आग्रह
मुक्ताईनगर | प्रतिनिधी
देहू-आळंदीच्या मानाच्या पालख्यांप्रमाणे संत मुक्ताबाई पालखी सोहळ्यालाही शासनाकडून विशेष निधी, सुविधा व अधिकृत मान्यता मिळावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. २४ जून रोजी प्रस्थान करणाऱ्या संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत तसेच बुलडाणा येथे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या मागण्यांवर चर्चा करण्यात आली.
बैठकीत मुक्ताईनगर ते पंढरपूर हा पालखी मार्ग अधिकृत पालखी मार्ग म्हणून घोषित करावा, तसेच पालखीचा मुक्काम होणाऱ्या ग्रामपंचायतींना शासनाकडून विशेष अनुदान द्यावे, अशी मागणी करण्यात आली. सध्या देहू आणि आळंदी येथील पालखी सोहळ्यांना मिळणाऱ्या सुविधांप्रमाणेच संत मुक्ताबाई पालखी सोहळ्यालाही समान दर्जाचे सहकार्य मिळावे, अशी भूमिका मांडण्यात आली.
संत मुक्ताबाईंच्या आषाढी वारीत खान्देश, विदर्भ, मराठवाडा तसेच मध्य प्रदेशातून हजारो वारकरी सहभागी होतात. २५ जून रोजी पालखी बुलडाणा जिल्ह्यात प्रवेश करणार असून उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता वारकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याचे टँकर, मोबाइल स्वच्छतागृहे आणि आवश्यक सोयी-सुविधा वाढविण्याची मागणी करण्यात आली.
पालखी मार्गावरील अतिक्रमणे हटविणे, शुद्ध पिण्याचे पाणी, फिरती आरोग्य सेवा, चोवीस तास रुग्णवाहिका, तात्पुरते निवारे, स्नानगृहे व स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्याची मागणीही बैठकीत करण्यात आली. तसेच पालखीसोबत असणाऱ्या मानाच्या अश्वांसाठी व बैलजोड्यांसाठी वैरण-पाण्याची व्यवस्था शासनाने करावी, असेही सूचित करण्यात आले.
वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी संवेदनशील ठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढविणे, तसेच पालखी मार्गावरील जड वाहनांची वाहतूक तात्पुरती बंद ठेवण्याची मागणी करण्यात आली. यामुळे अपघातांचा धोका कमी होऊन वारी अधिक सुरक्षित होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
विभागीय आयुक्तांना बैठकीचे निर्देश
आषाढी वारीच्या तयारीसंदर्भात पुण्यात झालेल्या बैठकीत संत मुक्ताबाई संस्थानचे प्रमुख रवींद्र पाटील यांनी राज्यातील विविध पालखी सोहळ्यांबाबत होणारा कथित शासकीय दुजाभाव दूर करण्याची मागणी केली. देहू-आळंदीप्रमाणेच संत मुक्ताबाई, संत निवृत्तीनाथ आणि संत एकनाथ यांच्या पालख्यांनाही समान सुविधा मिळाव्यात, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
या मागणीची दखल घेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विभागीय आयुक्तांना तातडीने स्वतंत्र बैठक घेऊन या विषयावर ठोस तोडगा काढण्याचे निर्देश दिले असून लवकरच यासंदर्भात पुढील बैठक होण्याची शक्यता आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत