Contact Banner

पाचोरात विजेच्या शॉकने २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू महावितरणच्या निष्काळजीपणावर संताप;

 

pachora-youth-dies-of-electric-shock-mahavitaran-negligence-sparks-outrage


पाचोरात विजेच्या शॉकने २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू महावितरणच्या निष्काळजीपणावर संताप;






पाचोरा (लेवाजगत न्यूज प्रतिनिधी) : पाचोरा शहरातील हिंद ऑईल मिल रोड परिसरात कट झालेल्या वीज सर्व्हिस वायरचा शॉक लागून २३ वर्षीय लोकेश दत्तात्रय जडे या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. २४) सकाळी घडली. या घटनेनंतर महावितरणच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, शहरातील जीर्ण व धोकादायक वीज तारा आणि सर्व्हिस वायरचे तातडीने सर्वेक्षण करून दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माजी नगरसेवक दत्तात्रय जडे यांच्या घराजवळील वीज खांबावरून घराला वीजपुरवठा करण्यात आला आहे. बुधवारी सकाळी लोकेश जडे हा घराच्या बाहेरील लोखंडी जिन्याने वरच्या मजल्यावर जात असताना कट झालेल्या सर्व्हिस वायरचा त्याच्या खांद्याला स्पर्श झाला. त्यावेळी पाऊस सुरू असल्याने त्याला जोरदार विजेचा धक्का बसला आणि तो खाली कोसळला. तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.

पाचोरात वारंवार विजेच्या शॉकच्या घटना

पाचोरा शहरात यापूर्वीही विजेचा शॉक लागून अनेक दुर्घटना घडल्या आहेत. मात्र या घटनांमधून कोणताही धडा न घेता धोकादायक वीज तारा, सैल झालेल्या वायर आणि जीर्ण झालेल्या वीज यंत्रणेची वेळेवर दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

घरांच्या अगदी जवळून मेन लाईन; नागरिक धास्तावले

शहरातील काही भागांसह महाविद्यालय परिसरालगत अनेक ठिकाणी उच्चदाब वीजवाहिन्या आणि मुख्य वीजपुरवठा वाहिन्या घरांच्या अगदी जवळून जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण होत असून, याकडे महावितरण प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

शहरव्यापी सर्वेक्षणाची मागणी

लोकेश जडे यांच्या मृत्यूनंतर संतप्त नागरिकांनी संपूर्ण पाचोरा शहरातील वीज यंत्रणेचे तातडीने सर्वेक्षण करून जीर्ण झालेल्या तारा, कट झालेल्या सर्व्हिस वायर, धोकादायक खांबे आणि घरांजवळून जाणाऱ्या वीजवाहिन्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी महावितरणने विशेष मोहीम राबवावी, अशीही मागणी होत आहे.

तरुणाच्या मृत्यूने शहर हळहळले

अवघ्या २३ वर्षांच्या लोकेश जडे या तरुणाचा झालेला दुर्दैवी मृत्यू संपूर्ण पाचोरा शहराला हादरवून गेला आहे. या घटनेमुळे जडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.