पाळधीजवळ भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी
पाळधीजवळ भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी
लेवाजगत न्युज धरणगाव : तालुक्यातील सावदा-रिंगणगाव रस्त्यावर पाळधीजवळ सोमवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत आणखी एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
अपघातात किरण बाबूलाल राक्षे-मराठे (वय ३८, रा. पथराड, ता. धरणगाव), चेतन पाटील (वय ३५, रा. वाडेगुडे, ता. भडगाव) आणि प्रदीप उखा निकम (वय ४०, रा. गोंदेगाव-निंभोरा, ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) यांचा मृत्यू झाला. तर बाबूलाल राक्षे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, किरण राक्षे हे पद्मालय येथे एका लग्नसमारंभासाठी गेले होते. समारंभ आटोपल्यानंतर ते आपल्या दुचाकीने घरी परतत असताना त्यांच्या दुचाकीवर वडील बाबूलाल राक्षे मागे बसले होते. दरम्यान, पाळधीजवळ समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीची त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली.
धडक इतकी भीषण होती की दोन्ही दुचाकींचा चक्काचूर झाला. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर किरण राक्षे, चेतन पाटील आणि प्रदीप निकम यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
या दुर्घटनेमुळे तीन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृतांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत