अपघातानंतर मृत्यूशी झुंज देणाऱ्या तरुणाला नवजीवन; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील मेंदूविकार तज्ज्ञांचे प्रयत्न यशस्वी
अपघातानंतर मृत्यूशी झुंज देणाऱ्या तरुणाला नवजीवन; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील मेंदूविकार तज्ज्ञांचे प्रयत्न यशस्वी
जळगाव (लेवाजगत न्यूज) : चाळीसगाव तालुक्यातील ३५ वर्षीय तरुणाला भरधाव कारच्या धडकेत डोक्याला गंभीर दुखापत होऊन जीवघेणी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील मेंदूविकार तज्ज्ञांच्या तत्परतेमुळे आणि तातडीने करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेमुळे या तरुणाला नवजीवन मिळाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश (वय ३५) हे पायी जात असताना भरधाव कारने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने हात-पायांची हालचाल बंद झाली होती. तसेच ते डोळे उघडण्यासही असमर्थ झाले होते. प्रकृती झपाट्याने खालावत असल्याने नातेवाईकांनी त्यांना तातडीने डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल केले.
सीटी स्कॅनमध्ये गंभीर दुखापतीचे निदान
रुग्णालयात दाखल होताच मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. विपूल राठोड व त्यांच्या टीमने रुग्णाची तपासणी केली. श्वसनास त्रास होत असल्याने रुग्णाला तातडीने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. त्यानंतर करण्यात आलेल्या सीटी स्कॅन तपासणीत कवटीला फ्रॅक्चर झाल्याचे तसेच मेंदूच्या परायटल भागात एपिड्युरल हेमेटोमा (ईडीएच) म्हणजेच रक्ताची गाठ तयार झाल्याचे आढळून आले. मेंदूवरील वाढत्या दाबामुळे रुग्णाचा जीव धोक्यात आला होता.
वेळेवर घेतलेल्या निर्णयामुळे वाचला जीव
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉ. विपूल राठोड यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय पथकाने तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. कौशल्यपूर्ण पद्धतीने करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेद्वारे मेंदूतील रक्तस्त्राव नियंत्रित करण्यात आला तसेच साचलेले रक्त काढून मेंदूवरील दाब कमी करण्यात आला.
शस्त्रक्रियेनंतर रुग्णावर अतिदक्षता विभागात विशेष उपचार करण्यात आले. या प्रक्रियेत डॉ. श्रृती खंडागळे, डॉ. प्रितम दास, डॉ. निशा आणि भूलतज्ज्ञ डॉ. शितल फेगडे यांनी सहकार्य केले. आयसीयूतील शालिक चौधरी, नर्सिंग कर्मचारी व तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे रुग्णाच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा झाली. सध्या रुग्ण पूर्णपणे शुद्धीवर असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
'सुवर्ण तासांतील उपचार महत्त्वाचे'
"डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानंतर पहिल्या काही तासांतील उपचार अत्यंत महत्त्वाचे असतात. या रुग्णाच्या बाबतीत सीटी स्कॅनमध्ये एपिड्युरल हेमेटोमा आणि कवटीचे फ्रॅक्चर आढळून आले होते. तातडीने शस्त्रक्रिया केल्यामुळे मेंदूवरील दाब कमी करता आला आणि रुग्णाचा जीव वाचविणे शक्य झाले."
– डॉ. श्रृती खंडागळे, डॉ. उल्हास पाटील रुग्णालय



कोणत्याही टिप्पण्या नाहीत