Contact Banner

पंढरपूर दुर्घटनेतील प्रत्यक्षदर्शीचा थरारक अनुभव; विहिरीला संरक्षक भिंत नसल्यानेच अनर्थ? विहीर मालकांचा प्रशासनावर गंभीर आरोप

 

pandharpur-pickup-accident-8-devotees-killed-witness-irfan-rescue-well-owner-alleges-administration-negligence

पंढरपूर दुर्घटनेतील प्रत्यक्षदर्शीचा थरारक अनुभव; विहिरीला संरक्षक भिंत नसल्यानेच अनर्थ? विहीर मालकांचा प्रशासनावर गंभीर आरोप

pandharpur-pickup-accident-8-devotees-killed-witness-irfan-rescue-well-owner-alleges-administration-negligence


लेवाजगत न्यूज  पंढरपूर (सोलापूर) : म्हसवड–पंढरपूर मार्गावरील तांदूळवाडी गावाजवळ भाविकांची पिकअप गाडी विहिरीत कोसळून झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे. देवदर्शन करून आनंदाने घरी परतणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला. या दुर्घटनेत ८ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. या भीषण अपघाताचा थरार प्रत्यक्षदर्शी इरफान यांनी सांगितला, तर विहीर मालक रामकृष्ण कदम यांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर गंभीर आरोप केले आहेत.

अपघातग्रस्त पिकअप गाडीच्या अगदी मागून इरफान स्वतःच्या वाहनाने प्रवास करत होते. त्यामुळे संपूर्ण घटना त्यांच्या डोळ्यांसमोर घडली. अपघाताचा प्रसंग सांगताना त्यांनी सांगितले की, रस्ता पूर्णपणे मोकळा होता. पिकअपच्या पुढे किंवा मागे कोणतेही वाहन नव्हते. मात्र सुमारे २०० फुटांपासूनच गाडी जोरदार हिंदोळे खात असल्याचे दिसत होते. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याचे दूरूनच जाणवत होते.

नियंत्रण सुटलेली पिकअप रस्त्याच्या कडेला असलेल्या उघड्या विहिरीच्या दिशेने वेगाने गेली आणि काही क्षणांतच थेट विहिरीत कोसळली. चालकाला समोर विहीर असल्याचे लक्षात आले नसावे किंवा वाहनावरील ताबा पूर्णपणे सुटला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. विहिरीला मजबूत सिमेंटचा कठडा असता तर हा मोठा अनर्थ टळू शकला असता, अशी खंतही इरफान यांनी व्यक्त केली.

गाडी विहिरीत पडताच घटनास्थळी एकच आक्रोश उसळला. मदतीसाठी किंचाळ्या ऐकताच इरफान यांनी क्षणाचाही विलंब न करता गाडी थांबवली. त्यावेळी त्यांना चार ते पाच वर्षांचे एक लहान बाळ पाण्यावर तरंगताना दिसले. “त्या चिमुरड्याला पाहताच मी कोणताही विचार न करता विहिरीत पहिली उडी मारली. बाळासह आणखी काही जणांना बाहेर काढण्यात आम्हाला यश आले. तर दोन जण स्वतः पोहत वर आले,” असे त्यांनी सांगितले.

इरफान यांच्या धाडसामुळे काही जणांचे प्राण वाचले. घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले. पंढरपूरच्या नगराध्यक्षा प्रणित भालके यांनीही त्यांच्या धाडसाचे कौतुक करत मनापासून आभार व्यक्त केले.

विहीर मालकांचा प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप

दरम्यान, या दुर्घटनेनंतर विहीर मालक रामकृष्ण कदम यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. “आज अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. अशी घटना घडायला नको होती. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलींचा समावेश असल्याने त्यांना विहिरीतून बाहेर काढताना आमचा कंठ दाटून आला. मात्र या दुर्घटनेला प्रशासनाचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे,” असे त्यांनी सांगितले.

कदम यांनी सांगितले की, संबंधित विहीर रस्त्याच्या अगदी लगत असल्याने वाहन थेट विहिरीत कोसळण्याचा धोका पूर्वीपासूनच होता. त्यामुळे विहिरीभोवती मजबूत संरक्षक भिंत उभारण्याची मागणी त्यांनी अनेकदा प्रशासनाकडे केली होती. “वाहने थेट विहिरीत जाऊ शकतात, हे ओळखून आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला. याबाबत थेट जिल्हाधिकाऱ्यांकडेही निवेदन दिले होते. मात्र प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. जर वेळेत मजबूत कठडा उभारण्यात आला असता, तर आजचा हा भीषण अपघात टळला असता,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

८ भाविकांचा मृत्यू, ६ जणांवर उपचार सुरू

या हृदयद्रावक दुर्घटनेत ८ भाविकांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. तर ६ जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे तांदूळवाडी परिसरासह संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असून अपघाताच्या कारणांची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.