मारुती मंदिराचा सभामंडप कोसळला; 30-40 भाविक जखमी, काहींचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती
परभणीतील यशवाडी देवस्थानात भीषण दुर्घटना; सभामंडपाचे पिलर कोसळून अनेक भाविक जखमी, मृत्यूचीही भीती
परभणी | प्रतिनिधी
परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील प्रसिद्ध श्रीक्षेत्र यशवाडी देवस्थान येथे शनिवारी दुपारी मोठी दुर्घटना घडली. मंदिरासमोरील बांधकाम सुरू असलेल्या सभामंडपाचे पिलर कोसळल्याने ३० ते ४० भाविक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, काही जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शनिवार असल्याने यशवाडी देवस्थानात दर्शन, कीर्तन व महाप्रसादासाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी झाली होती. शेकडो भाविक सभामंडपात उपस्थित असतानाच अचानक पिलर कोसळल्याने एकच गोंधळ उडाला. मोठा आवाज होताच भाविकांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव केली.
घटनेनंतर पोलिस, महसूल प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. ढिगाऱ्याखालून अडकलेल्या भाविकांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, अनेक रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात येत आहे.
या दुर्घटनेबद्दल खासदार संजय जाधव यांनी दुःख व्यक्त करत जखमींना तातडीने उपचार मिळावेत आणि प्रशासनाने सर्वतोपरी मदतकार्य करावे, असे आवाहन केले. तसेच परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनीही ही घटना अत्यंत वेदनादायी असल्याचे सांगत बाधित भाविकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा विश्वास व्यक्त केला.
दरम्यान, या दुर्घटनेमुळे यशवाडी परिसरात शोककळा पसरली असून, मृत व जखमींची अधिकृत माहिती प्रशासनाकडून अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत