प्रा. किसन वराडे लिखित 'देणे प्रतिभेचे' गझलसंग्रहाचे अंबरनाथ येथे उत्साहात प्रकाशन
प्रा. किसन वराडे लिखित 'देणे प्रतिभेचे' गझलसंग्रहाचे अंबरनाथ येथे उत्साहात प्रकाशन
अंबरनाथ (प्रतिनिधी – सुनील इंगळे) : प्रा. किसन वराडे लिखित 'देणे प्रतिभेचे' या गझलसंग्रहाचा प्रकाशन सोहळा नुकताच अंबरनाथ येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. बाजीगर प्रकाशन प्रकाशित हा गझलसंग्रह साहित्यप्रेमी आणि गझल रसिकांसाठी एक महत्त्वपूर्ण साहित्यकृती ठरणार असल्याचे मान्यवरांनी यावेळी सांगितले.
या गझलसंग्रहाला आद्य मराठी गझल संशोधक प्रा. डॉ. अविनाश सांगोलेकर यांची प्रस्तावना लाभली असून, विजय जोशी यांनी या पुस्तकाची पाठराखण केली आहे. सामाजिक वास्तव, मानवी भावभावना, वेदना, आनंद आणि जीवनातील विविध अनुभवांचे प्रभावी चित्रण या गझलसंग्रहातून करण्यात आले आहे.
पुस्तकाचे आकर्षक मुखपृष्ठ कु. अक्षरा पाटील हिने साकारले असून, तिच्या कल्पकतेचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले. हे मुखपृष्ठ पुस्तकाच्या आशयाशी सुसंगत असून वाचकांच्या मनाचा ठाव घेणारे असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. अविनाश सांगोलेकर होते. उद्घाटक म्हणून प्रा. गुणवंत भंगाळे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे, गझलकार प्रदीप निफाडकर, साहित्यिका प्रा. संध्या महाजन, कवी-गझलकार विजय जोशी तसेच ज्येष्ठ गझलकार व प्रकाशक सिराज शिकलगार यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मनीषा कोल्हे यांनी बहिणाबाईंची 'माही माय सरसोती' ही कविता सादर केली, तर कु. प्रचिती वराडे हिने स्वागतगीतावर नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विवेक वराडे यांनी केले, तर डॉ. जयेश वराडे यांनी आभार प्रदर्शन केले. सूत्रसंचालन तुषार वाघुळदे आणि दीपाली कात्रे यांनी प्रभावीपणे केले.
राज्यभरातील साहित्यप्रेमी, कवी, गझलकार आणि रसिकांनी या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
विशेष म्हणजे, गझलकार प्रा. किसन वराडे यांनी हा गझलसंग्रह आपल्या पत्नी प्रतिभा वराडे यांना प्रेमपूर्वक अर्पण केला आहे. कार्यक्रमाध्यक्ष प्रा. डॉ. अविनाश सांगोलेकर यांनी उपस्थितांना हा गझलसंग्रह आवर्जून वाचण्याचे व त्यातील आशयाचा अनुभव घेण्याचे आवाहन केले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत