Contact Banner

बहिणाई ज्येष्ठ नागरिक महिला संघाचा १८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

 

bahinai-senior-citizen-women-association-18th-foundation-day-celebrated-jalgaon

बहिणाई ज्येष्ठ नागरिक महिला संघाचा १८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

जळगाव (प्रतिनिधी) : जळगावातील चैतन्य नगर परिसरात कार्यरत असलेल्या बहिणाई ज्येष्ठ नागरिक महिला संघाचा १८ वा वर्धापन दिन विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.






कार्यक्रमाची सुरुवात गणेशपूजन, प्रार्थना आणि बहिणाई यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. ईनामदार, अरुण थोरात, उत्तर महाराष्ट्र प्रादेशिक क्षेत्राचे डॉ. मालेगावकर तसेच पी. डी. चौधरी उपस्थित होते. संस्थेच्या अध्यक्षा आशा रघुनाथ तळेले यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला.

वर्धापन दिनानिमित्त महादेव हॉस्पिटलच्या सहकार्याने ज्येष्ठ महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी, मधुमेह व रक्तदाब तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा सुमारे १३० महिलांनी लाभ घेतला.

यावेळी उपस्थित मान्यवरांसह बहिणाई ज्येष्ठ नागरिक महिला संघाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकारी मंडळातील सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात ‘मुलगी वाचवा, मुलगी शिकवा’ या सामाजिक संदेशावर आधारित भारुड सादर करण्यात आले. या प्रभावी सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत भरभरून दाद दिली.

प्रास्ताविकातून संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि लोकोपयोगी उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती पाटील यांनी केले, तर आभारप्रदर्शन शारदा खडके यांनी केले. पसायदान आणि सामुदायिक घोषणेनंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

हा वर्धापन दिन सोहळा यशस्वी करण्यासाठी सचिव रजनी सुरेश महाजन, खजिनदार कौसल्या मनोहर पाटील, कार्यकारी मंडळातील सर्व सदस्य तसेच चैतन्य नगर संघाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.